जिल्ह्य़ाला मोठी नाटय़परंपरा लाभली असतांना गेल्या काही वर्षांत शहरातील हौशी व व्यावसायिक नाटके बंद झालेली आहेत, परंतु मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून कलारसिक शिक्षण व सांस्कृतिक संस्थेने केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. नाटय़क्षेत्रातील काम असेच जोमाने सुरू राहिल्यास बुलढाणा ड्रामा सिटी होऊ शकते, असा आशावाद बुलढाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर यांनी व्यक्त केला. भविष्यात कलारसिकांच्या नाटय़निर्मितीसाठी बुलढाणा अर्बन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.
जागतिक मराठी रंगभूमी दिनानिमित्त अनिल अंजनगर यांनी दिग्दर्शक, निर्माता व कलावंत यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यात डॉ.झंवर बोलत होते. या वेळी प्रसिध्द उर्दू शायर डॉ. गणेश गायकवाड, नरेंद्र लांजेवार, स्त्रीमुक्ती चळवळीच्या अध्यक्षा डॉ. इंदूमती लहाने, सुरेखा खोत उपस्थिती होते. या वेळी शहरातील ज्येष्ठ नाटय़ कलावंत शंकर कराडे, यशवंत बोरीकर, दिवाकर देशपांडे, दादा पळसोदकर, वैशाली आंबेकर यांच्या योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विजय सोनोने, अनिल अंजनकर यांनी श.ना.नवरे यांनी लिहिलेली ‘डाग’ ही एकांकिका सादर केली. यावेळी शिवाजी दाभाडे, कल्याणी जाधव यांनी नृत्य सादर केले, तसेच प्रकाश खरे, मनोज नंद्रेकर, विशाल बटुकार, रितेश खडके या युवा कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाला शहरातील नाटय़रसिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. नव्या वर्षांत एकांकिका व तीन अंकी नाटकांची निर्मिती करण्यात येईल, असे अनिल अंजनकर यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार अनिल अंजनकर यांनी मानले. यासाठी गजानन सुरूशे, रमेश आराख, प्रकाश खरे, मनोज नंद्रेकर, विशाल बट्टकार, रितेश खडके, शिवाजी दाभाडे, कल्याणी जाधव आदिंनी परिश्रम घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा