यावर्षी जिल्ह्य़ात पावसाचे अत्यल्प प्रमाण झाल्यामुळे सिंचन प्रकल्पात पाण्याचा साठा झाला नाही. शिवाय, कमी पावसामुळे खरीप उत्पादनात कमालीची घट आली. आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. डेंग्यूचा आजाराने थमान घातले आहे. रोहयोची कामे नाहीत, अशी भीषण परिस्थिती जिल्ह्य़ात असतांनाही प्रशासनाने सदोष आणेवारी काढून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी आमदार विजयराज शिंदे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काल खामगाव येथे आले असता त्यांना आमदार विजयराज शिंदे यांनी मागण्यांचे निवेदन दिले. यात यावर्षी जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सिंचन व पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पात जलसाठा झाला नाही. अत्यल्प पावसामुळे कापूस सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. ऐन वेळेवर जिल्हा बॅंकेतून पीककर्ज न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी खाजगी सावकारांकडून कर्ज घेऊन शेतीची पेरणी केली. तशातच प्रशासनाने सदोष आणेवारी काढून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. कापूस व सोयाबीनला यावर्षी कमी झडती आहे. असे असतांनाही हमीभाव नसल्यामुळे व्यापारी सोयाबीनची कमी दरात खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. तशातच कंपन्यांनी बोगस बियाणांचा पुरवठा केल्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके उगवलीच नाहीत. जनावरांना चारा नाही त्यामुळे जनावरांचे पोट कसे भरावे, असा प्रश्न पशूमालकांना सतावत आहे.
जिल्ह्य़ाला ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच साथरोगांनी थमान घातले आहे. डेंग्यूच्या आजाराने अनेकांचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. अशी भीषण परिस्थिती असताना देखील प्रशासन स्तरावर कुठल्याच उपाययोजना राबविण्यात येत नाहीत.
दुष्काळी परिस्थितीत करावयाची कामे ठप्प आहेत. जिल्ह्य़ात रोजगार हमी योजनेची कामे सुरू नाहीत. रोहयोची मजुरी कमी असल्याने या योजनेसाठी मजूर मिळत नाही. त्यामुळे या मजुरीत वाढ करून कामे सुरू करण्याची गरज आहे.
जिल्ह्य़ावर भीषण दुष्काळाचे सावट असतानाही शासन व प्रशासन वस्तुस्थिती न पाहता कागदी घोडे नाचविण्यातच दंग आहे.
दुष्काळी तालुक्याची यादी जाहीर करतांना शासनाने जिल्ह्य़ावर प्रचंड अन्याय केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची हेळसांड थांबविण्यासाठी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा प्रमुख दत्ता पाटील, ज्ञानदेव मानकर, तालुका प्रमुख अर्जुन दांडगे, भोजराज पाटील, सुरेश वावगे, जिल्हा उपप्रमुख वसंतराव भोजने, शहर प्रमुख संजय अवजोड व प्रकाश देशलहरा उपस्थित होते.
बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा -आ. शिंदे
यावर्षी जिल्ह्य़ात पावसाचे अत्यल्प प्रमाण झाल्यामुळे सिंचन प्रकल्पात पाण्याचा साठा झाला नाही. शिवाय, कमी पावसामुळे खरीप उत्पादनात कमालीची घट आली. आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. डेंग्यूचा आजाराने थमान घातले आहे.
First published on: 10-11-2012 at 01:19 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana district declared drought district