या जिल्ह्य़ात आठवडय़ापासून ओढ दिलेल्या पावसाचे बुधवारपासून पुनरागमन झाले. गेल्या दोन दिवसात पावसाची रिमझिम सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्य़ातील  पेरण्या आटोपल्या असून जिल्हाभर पिकांच्या आंतर मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. जिल्ह्य़ातील विविध सिंचन प्रकल्पाच्या व तलावांच्या जलसाठय़ाच्या  पातळीत अल्पप्रमाणात का होईना वाढ झाली आहे. दरम्यान, सोळाहून अधिक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पेरणीनंतर निंदणी, खुरपणी व कोळपणीला प्रारंभ झाला आहे. मात्र, जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचा तणनाशक फवारणीकडे प्रामुख्याने कल दिसून येत आहे. मात्र, तणनाशकाचे भाव दीड ते दोनपट वाढले असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले जात आहे. जिल्ह्य़ात बुधवारपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. दोन दिवसांपासून पावसाची झड सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे सिंचन प्रकल्प व तलावांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. बुलढाणा तालुक्यातील करडी धरणात दहा ते पंधरा टक्के साठा झाला आहे. मन प्रकल्पात सोळा टक्के, तोरणा प्रकल्पात पंधरा टक्के, वाण प्रकल्पात ऐंशी टक्के, पेनटाकळी प्रकल्पात पाच दलघमी, खडकपूर्णात पस्तीस दलघमी, नळगंगा प्रकल्पात चौदा टक्के, पलढगमध्ये सोळा टक्के, ज्ञानगंगामध्ये सतरा टक्के, मस प्रकल्पात नऊ टक्के पाणी साठा झाला आहे. सोबतच विहिरी, विंधन विहिरी, गावतलाव व अन्य जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
सातपुडा कुशीतील वाण प्रकल्पात ८२ दलघमी पाणीसाठा झाला असल्याने संग्रामपूर तालुक्यातील सगोडा, दानापूर, पिंगळी, जहॉंगीर, खळद, काटेल, पोलद, काकनवाडा, वाणखेड, दुर्गादैत्य, लिंगनवाडी,   पार्तूडा, नेकनामपूर, टाकळीपंच यासह सोळाहून अधिक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्य़ातील तेराही तालुक्यात पाऊस झाला असून, सर्वात जास्त ५८ मि.मी. पाऊस संग्रामपूर, तर सर्वात कमी मेहकर येथे ३ मि.मी. पाऊस झाला आहे. तालुक्यातील पडलेला पाऊस मि.मी.मध्ये बुलढाणा- २४, चिखली- १४, देऊळगावराजा- १२, मेहकर- ३, लोणार- ४, सिंदखेडराजा- १०.२०, मलकापूर- २०.४०, मोताळा- १९, नांदुरा- २८, खामगाव- १९, शेगाव- २६, जळगाव जामोद- ४५, तर संग्रामपूर येथे ५८ मि.मी. पाऊस झाला आहे. आजचा पाऊस २८२.६० मि.मी. झाला असून, त्याची टक्केवारी २१.७४ आहे. १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्य़ात ३८२९.२२ मि.मी. पाऊस झाला असून त्याची टक्केवारी २९४.५६  आहे.

‘त्या’ विहिरीला अखेरचा निरोप की जीवदान?
वार्ताहर, यवतमाळ</strong>
संततधार पावसामुळे वसाहतीतील जुनी आणि भली मोठी सार्वजनिक विहीर खचल्याने एक तर ती बुजवून तिला अखेरचा निरोप द्यावा किंवा नव्याने बांधून जीवदान द्यावे, या मागणीसाठी वसाहतीतील रहिवाशांमध्ये मतभेद असल्याने त्या विहिरीचे काय करावे, याबाबत अखेर जिल्हा प्रशासनाने घटनास्थळाचे निरीक्षण करून अंतिम निर्णय  घ्यावा, अशी मागणी लोकशाही दिनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे करण्यात आली आहे.