या शहरातील मेन रोड व लगतच्या प्रमुख रस्त्यावर आठवडी बाजाराचे प्रस्थ वाढू लागले आहे. त्यामुळे आठवडी बाजाराच्या रविवारच्या दिवशी या परिसरात तुंडुंब गर्दी होऊन वाहतूक ठप्प होते. त्यामुळे पोलिसांना वाहतूक व गर्दीवरील नियंत्रण सर्वस्वी अशक्य होते. आठवडी बाजाराच्या अरुंद रस्ते व वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची शक्यता निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. या पाश्र्वभूमीवर येथील आठवडी बाजाराचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात यावे, असा प्रस्ताव शहर पोलीस ठाण्याच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकारी व नगर प्रशासनास पाठविण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
या शहराचा आठवडी बाजार हा मेन रोडवर भरतो. पूर्वी लोकसंख्येच्या तुलनेत आता आठवडी बाजाराची जागा कमी पडू लागल्याने स्टेट बॅंक चौक ते मेन रोड, मलकापूर रोड, सिनेमा टॉकीज, नगर परिषद आवार अशा अनेक ठिकाणी हा बाजार पसरला आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी शहरातील या रस्त्याच्या मधोमध व दुतर्फा अनेक लहान मोठय़ा व्यावसायिकांनी दुकाने थाटल्यामुळे स्थायी दुकानदारांची परवड होत आहे. वाहतुकीच्या हमरस्त्यावर मधोमध दुकाने लावण्यासाठी या दिवशी प्रचंड स्पर्धा व चढाओढ असते. दुकानदार व बाजार करण्यासाठी आलेले ग्राहक यांच्या तुडूंब गर्दीमुळे आठवडी बाजाराला जत्रेचे स्वरूप येते. त्यामुळे आठवडी बाजारातून चालणेही कठीण होते. वाहतुकीचा देखील यक्ष प्रश्न निर्माण होतो.
प्रचंड गर्दीमुळे बाजारात चेंगराचेंगरीची, तसेच कायदा व सुव्यवस्था मोडकळीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही वर्षांपूर्वी नगर परिषदेने आठवडी बाजार अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या, मात्र त्यासाठी आवश्यक त्या जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. बुलढाण्याच्या आठवडी बाजाराचे अन्यत्र पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे. शहर पोलीस ठाण्याने हा आठवडी बाजार अन्यत्र सुरक्षित ठिकाणी भरवावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व नगर प्रशासनास पाठविला आहे. या पाश्र्वभूमीवर बुलढाण्याचे ठाणेदार सूर्यकांत बांगर यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व चेंगराचेंगरीसारख्या अनुचित घटना घडू नये म्हणून शहराचा बाजार इतरत्र हलविण्याची आवश्यकता आहे.
आठवडी बाजाराचे नियोजन व नियंत्रण अतिशय महत्त्वाचे आहे. सद्याच्या जागेत वाढती गर्दी लक्षात घेता हे नियोजन व नियंत्रण करणे अशक्य झाले आहे. बुलढाणा शहराची व त्यावर अवलंबून असलेल्या गावांची संख्या लक्षात घेता आठवडी बाजार प्रशस्त व सुटसुटीत जागेत भरविण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. या संदर्भात वरिष्ठांना सविस्तर अहवाल सादर करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
बुलढाणा आठवडी बाजाराला हवी सुरक्षित विस्तीर्ण जागा!
या शहरातील मेन रोड व लगतच्या प्रमुख रस्त्यावर आठवडी बाजाराचे प्रस्थ वाढू लागले आहे. त्यामुळे आठवडी बाजाराच्या रविवारच्या दिवशी या परिसरात तुंडुंब गर्दी होऊन वाहतूक ठप्प होते. त्यामुळे पोलिसांना वाहतूक व गर्दीवरील नियंत्रण सर्वस्वी अशक्य होते. आठवडी बाजाराच्या अरुंद रस्ते व वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 06-12-2012 at 01:17 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana week market requires lots of secure place