राज्यात दहशतवादी कारवाया वाढल्याने, तसेच दहशतवादविरोधी पथकाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने संपूर्ण राज्यभरातील पोलीस ठाण्यांत स्वतंत्र दहशतवादविरोधी पथक स्थापन करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्हय़ातल्या ३६ पोलीस ठाण्यांत तातडीने अशा पथकांची स्थापना करण्यात आली.
आपापल्या भागातील संशयितांची माहिती तत्परतेने मिळावी, यासाठी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांत दहशतवादविरोधी पथक स्थापन होणार आहे. एक अधिकारी व पाच कर्मचारी यासाठी नियुक्त करण्यात येणार आहेत. त्या त्या पोलीस ठाण्यातील उपलब्ध मनुष्यबळावरच ही पथके स्थापन होणार आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात यापूर्वी जिल्हा विशेष पथक, गुन्हे शोध पथक कार्यरत होते. आता त्यात दहशतवादविरोधी पथकाची भर पडली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याच्या पोलीस महासंचालकांनी राज्यातल्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली. याच बैठकीत सर्व पोलीस अधीक्षक, आयुक्त यांनाही पथके स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. या पथकावर संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे नियंत्रण असणार आहे.
आपापल्या हद्दीतील संशयितांची माहिती एकत्रित करून वरिष्ठांना देणे, आवश्यक तेथे तत्परतेने कारवाई करणे, हे प्रमुख काम या पथकाकडे असणार आहे. पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी बुधवारी सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना हे पथक स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हय़ातल्या बहुतांश पोलीस ठाण्यांत या पथकांची स्थापना झाली.