शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत मारलेली कोलांटउडी हा शहरातील दहशतीचाच प्रकार असल्याचा आरोप आमदार अनिल राठोड यांनी केला. बोराटे यांनी पाठीत खंजीर खुपसला, त्यामागे प्रलोभनही असू शकते असे ते ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले.
उमेदवारीअर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी ऐनवेळी बोराटे यांनी शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मसह उमेदवारीअर्ज दाखल केला. शिवसेनेने त्यांना सोमवारी रात्रीच पक्षाचा एबी फॉर्म दिला होता. मात्र मंगळवारी तो न दाखल करता ऐनवेळी ही ही खेळी केल्याने येथील शिवसेनेची जागीही रिक्त राहिली आहे. या जागेवर आता शिवसेनेचा उमेदवारच नाही.
याबाबत बोलताना राठोड यांनी राष्ट्रवादी व बोराटे या दोघांवरही दहशतीचा आरोप केला. ते म्हणाले, निवडणुकीतील दहशत शहराला नवीन नाही. शिवसेनेने या दहशतीच्या विरोधात सतत संघर्ष केला आहे. या गोष्टीची नगरकरांनाही पूर्ण कल्पना आहे. या मंडळींच्या दहशतीचा सामना शिवसेनाच करू शकते हेही सर्वाना मान्य आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादीने बोराटे यांना उमेदवारी नाकारली होती. त्या वेळी शिवसेनेनेच पुन्हा मनपात पाठवून त्यांना उपकृत केले. त्याची तरी जाणीव बोराटे यांनी ठेवणे गरजेचे होते. मात्र ते ही गोष्ट विसरले असले, तरी नगरकर विसरणार नाहीत, तेच त्यांना याचा धडा शिकवतील असा विश्वास व्यक्त करतानाच शिवसेना या गुंडगिरीला भीक घालणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader