नवरात्र महोत्सव, दसरा, बकरी ईद, कोजागरी पौर्णिमा या सणांमुळे लांबणीवर पडलेली परभणी शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम उद्या (मंगळवारी) पुन्हा सुरू होणार आहे. शहरातील अतिक्रमणे हटवून ३० रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. युद्धपातळीवर ही मोहीम राबवून दिवाळीपूर्वी सर्व अतिक्रमणांचा अडथळा दूर होईल, असा अंदाज आहे. स्टेडियम संकुलातील हॉटेल अतिथी व छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. तथापि सण-उत्सवांमुळे ही मोहीम धीम्यागतीने चाललेली होती. ती आता गतिमान होणार आहे.
शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. मुख्य बाजारपेठेत काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून इमारती उभारल्या. बाजारपेठेतील अरुंद रस्त्यामुळे नागरिकांना वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे पाहिली असता शहर विकास आराखडा धाब्यावर बसवून अनेकांनी महापालिकेच्या जागेवर व्यवसाय सुरू केले. तत्कालीन आयुक्त सुधीर शंभरकर यांनी अतिक्रमण मोहिमेचा आराखडा तयार केला. नगररचना विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रस्त्याची रुंदी व अतिक्रमित जागेची नोंद करण्यात आली. शंभरकर यांच्या नियोजनानुसार २४ सप्टेंबरलाच ही मोहीम सुरू होणार होती. परंतु शंभरकर यांची बदली झाल्याने काही काळ मोहिमेला ब्रेक लागला. जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर २७ सप्टेंबरला नव्याने अतिक्रमण हटविण्याचे आदेश काढले. त्यानुसार ४ ऑक्टोबरला मोहीम सुरू होणार होती. परंतु दि. ५ पासून नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली. त्यामुळे मोहीम सणासुदीचे कारण देत व आवश्यक पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने थांबविण्यात आली. आता उद्या ही मोहीम वेग पकडणार आहे.
अतिक्रमण हटविण्यास महापालिका कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. प्रभाग अधिकारी स. इम्रान, अशोक पाटील, मीर शाकेर अली, शहर अभियंता रमेश वाघमारे, मालमत्ता व्यवथापक ए. डी. देशमुख, पाणीपुरवठा अभियंता बी. एस. दुधाटे, नगररचना विभागाचे रफिक अहमद, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड व कर विभागातील उबेद चाऊस यांच्यावर अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी उपायुक्त दीपक पुजारी यांनी सोपवली आहे. मोहीम संपेपर्यंत स्वत: हजर राहण्याचे आदेश बजावले. यात निष्काळजीपणा केल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मोहिमेबाबत महापौर प्रताप देशमुख यांना पत्राद्वारे माहिती देण्यात आली.
मोहिमेसाठी पोलीस बंदोबस्त, महापालिका कर्मचारी, जेसीबी मशीन, ट्रॅक्टर, टिप्पर ही सामुग्री सज्ज ठेवली आहे. बंदोबस्तास ५ पोलीस अधिकारी, ५० कर्मचारी, १० महिला पोलीस, महापालिकेचे ८० कामगार, ४ जेसीबी मशीन, ६ ट्रॅक्टर, ५ टिप्पर पथकासोबत राहणार आहे.

Story img Loader