काही दिवसांपासून दिंडोरी तालुक्यातील वणी परिसरात घरफोडय़ांचे सत्र सुरू झाले असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कादवा सहकारी साखर कारखान्यावरील तुळजा भवानी अ‍ॅग्रो या दुकानात १३ डिसेंबरच्या मध्यरात्री रोख रक्कम, लॅपटॉप, जनरेटर, व महागडी औषधे, असा चार लाखापेक्षा अधिक रकमेचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. या घटनेला काही तास होत नाहीत तोच वणी येथे एका ठिकाणी घरफोडी तर दोन ठिकाणी तसा प्रयत्न झाला. प्रशांत जंगम हे घरातील नातेवाईकांसह पाथर्डी तालुक्यात देव दर्शनासाठी गेले होते. १५ डिसेंबरला सकाळी ते घरी आले असता घराचे कुलूप निखळून पडलेले दिसले. घरातील चार लाखापेक्षा अधिक रक्कम व सोन्याच्या आभूषणांची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. जंगम यांनी गावातील जैन मंदिरालगत असलेल्या एका दुमजली इमारतीचा नुकताच व्यवहार केला होता. त्यासाठी
पैशांची जमवाजमव करून अन्य नातेवाईकांकडे मदतीच्या अपेक्षेने ते बाहेर गेले होते. परंतु ते येईपर्यंत चोरटय़ाने कार्यभार
पूर्ण केला. यापूर्वी वणी व परिसरात
झालेल्या चोऱ्यांचा तपास प्रलंबित असतानाच नव्या घटनांनी पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे.
शिवाजी रोडवरील प्रकाश बोरा यांच्या घरातील रोख रक्कम व दागिने असा पाच लाख ५० हजाराच्या चोरीचा अद्याप तपास नाही. पांडाणे येथील शामराव सोनवणे यांच्या घरातील  दीड लाख रुपयांच्या चोरीचा
तपासही अद्याप जैसे थे आहे.
शिक्षिका भारती देशमुख यांच्या घरातून दिवसा दीड लाखाचा ऐवज चोरटय़ांनी लांबवल्याची घटनाही तशीच. आठवडे बाजारातून परतणाऱ्या हिराबाई जाधव यांच्या अंगावरील सुमारे दोन लाखाचे दागिने दोन भामटय़ांनी लांबविले.
इण्डेन गॅस एजन्सीमध्ये दोन वेळा सिलिंडरची चोरी झाली. त्यामध्ये एकदा ४२ रिकामे तर एकदा ३६ भरलेली सिलिंडर  चोरण्यात आली.
लखमापूर येथील बंडोपंत मोगल यांच्या घरीही साडेतीन लाखाची चोरी झाली. त्याच दिवशी तेथे त्र्यंबक देशमुख, पोपट सोनवणे व अन्य एका ठिकाणी घरफोडीचा प्रकार
घडला. चौसाळे फाटय़ावर एका मालट्रकमधून औषधे चोरीस गेली. दुचाकी चोर,
भुरटय़ा चोऱ्या, आठवडे बाजारातून भ्रमणध्वनी चोरी, यांची तर गणतीच नाही.
 विशेष म्हणजे कितीतरी चोऱ्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. वणी पोलीस दलात सेवानिवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेल्यांची संख्या चांगलीच आहे. वणीचा वाढता विस्तार पाहता त्याकडे दुर्लक्ष करणे पोलिसांसाठी योग्य होणार नाही.

Story img Loader