ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विनयभंग तसेच बलात्कार या गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढत असतानाच आता घरफोडय़ांचेही सत्र सुरू झाले आहे. मुंब्रा भागात मंगळवारी चोरटय़ांनी दोन घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. तसेच यातील एका घटनेत चोरटय़ांनी घरातील गॅस सिलेंडरची टाकी चोरून नेली. त्यामुळे महागडय़ा गॅस सिलेंडरवर आता चोरटय़ांचा डोळा असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. त्याचप्रमाणे महानगर टेलीफोन निगम (एमटीएनएल) च्या जमिनीमध्ये पुरण्यात आलेल्या टेलीफोन केबल चोरण्याचे प्रकारही सुरुच आहेत. या सर्व वाढत्या घटनांमुळे ठाणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीमध्ये महिलांवरील अत्याचाराची मालिका सुरू झाली असून विनयभंग तसेच बलात्कार या सारख्या गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढू लागल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वाढत्या प्रकारांना रोखण्यासाठी ठाणे पोलीस विविध मोहिमा हाती घेतल्या आहेत. मात्र, असे असतानाच आता शहरामध्ये चोरटे सक्रीय झाल्याचे चित्र असून घरफोडीच्या घटना वाढू लागल्या आहेत. मुंब्रा भागातील शिमला पार्क परिसरात असीम अब्दुल रशीद आझमी राहतात. मंगळवारी चोरटय़ांनी त्यांच्या घराच्या खिडकीतून आत प्रवेश केला. त्यानंतर ११ हजारांची रोख रक्कम, मोबाईल, असा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा येथील अमृतनगर परिसरात जायरा आसीम शेख राहतात. मंगळवारी त्या नेहमीप्रमाणे मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी चोरटय़ांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरटय़ांनी पाच हजारांची रोख रक्कम, तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने याच्यासह घरातील गॅस सिलेंडरची टाकी चोरून नेली. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यंतरी मुंब्रा भागातच चोरटय़ांनी अशाच प्रकारे सोने-चांदीचे दागिने यांच्यासह गॅस सिलेंडरची टाकी चोरून नेली होती. महागडय़ा गॅस सिलेंडरला काळ्या बाजारात भलतेच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच चोरटय़ांनी आता गॅस सिंलेडरवर डोळा ठेवल्याचे घरफोडीच्या घटनांमधून उघड होऊ लागले आहे. घोडबंदर भागात मध्यंतरी एमटीएनएलच्या दूरध्वनी केबल चोरीला जाण्याचे प्रकार वाढीस लागले होते. जमिनीत पुरण्यात आलेल्या केबल वारंवार चोरीस जाऊ लागल्याने दूरध्वनी सेवा ठप्प होत होती.  एमटीएनएलने ‘अलार्म’ यंत्रणा बसविली होती. मात्र, तरीही चोरटय़ांचा उपद्रव सुरूच असून मागील दोन महिन्याच्या कालावधीत चोरटय़ांनी संकेत विद्यालय येथील मोकळ्या मैदानातून सुमारे १७ हजारांची केबल चोरीस गेली आहे.

Story img Loader