नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. मंत्री जाधव यांनी आदित्य ठाकरे यांची काल खिल्ली उडविली होती. ठाकरे हा शिवसेनेचा वाघ नव्हे, तर वासरू आहे, अशी टीका त्यांनी केली होती. ही टीका शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले. मंत्री जाधव यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत पुतळा हिसकावून घेतला. त्यातून पोलीस व शिवसैनिकांत झटापट झाली. विरोध करणाऱ्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
नीलम गो-हेंचे टिकास्त्र
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्हे यांना त्यांच्यावर तसेच आदित्य ठाकरे यांच्यावर मंत्री भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेबाबत विचारणा केली. त्या म्हणाल्या,‘‘ भास्कर जाधव यांच्या मुलाच्या लग्नाच्या प्रश्नावरून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका कडेला फेकले गेले होते. पक्ष नेत्यांचे लक्ष वेधून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. आदित्य हे वाघच आहेत. ते बाहेर आले तर जाधवसारख्यांना केकाटत पळावे लागेल. माझ्या विषयीच्या टीकेला उत्तर देण्यास शिवसैनिक समर्थ आहेत. माझे काम बोलत असल्याने कोणाच्या टीकेची काळजी करण्याचे कारणच नाही.’’