कामोठेवासीयांच्या अनेक वर्षांपासूनच्या बससेवेच्या प्रतीक्षेला नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने पूर्णविराम देत नवीन वर्षांच्या मुहूर्तावर कामोठेमध्ये मार्ग क्रमांक ५७ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक तीन आसनी रिक्षाचालकांच्या विरोधामुळे ही बससेवा काही वर्षांपूर्वी सुरू होण्याअगोदर बंद पडली होती. मात्र प्रादेशिक परिवहन विभाग व एनएमएमटीच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांची सोय लक्षात घेऊन येथे बससेवा सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. यामुळे कामोठेवासीयांसाठी २०१५ ची पहाट अच्छे दिन आल्यासारखीच असणार आहे. गुरुवारी सकाळी एनएमएमटीचे अध्यक्ष गणेश म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये ही बससेवा सुरू होणार आहे.
वसाहतीमध्ये चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या बससेवेला स्थानिक रिक्षाचालकांनी बसच्या काचा फोडून व चालकाला मारहाण करून विरोध दर्शवला होता. यानंतर सुरक्षेची हमी द्या, नंतरच बससेवा सुरू करतो, असा पवित्रा एनएमएमटी प्रशासनाने घेतल्याने नागरिकांना नाइलाजाने तीन आसनी रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी अनेकदा आवाज उठविला, मात्र चालक-वाहकांच्या सुरक्षेमुळे प्रत्यक्षात बससेवा सुरू व्हायला २०१५ उजाडले. उशिरा का होईना, मात्र सुरू होणाऱ्या ५७ क्रमांकाची बस मानसरोवर रेल्वे स्थानक ते खांदेश्वर रेल्वे स्थानक या मार्गावर असणार आहे. दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रवाशाने बसभाडय़ापोटी ४ रुपयांचे तिकीट व चार किलोमीटरच्या प्रवासासाठी ७ रुपये तिकीट भाडे मोजून हा प्रवास करावा लागणार आहे. कामोठे वसाहतीमधील मुख्य चौकातून सर्वसामान्य प्रवाशांना या बससेवेचा फायदा उचलता येईल याची खबरदारी एनएमएमटीने घेतली आहे. सध्या कामोठे हायवे ते मानसरोवर रेल्वेस्थानकासाठी प्रति दहा रुपये भाडे रिक्षाचालक आकारत आहे. त्यामुळे एनएमएमटीचा प्रवास स्वस्त होणार आहे. एनएमएमटीच्या बससेवेमुळे कामोठेवासीयांना सणासुदीच्या काळात वाट तुडविण्याची वेळ येणार नाही. प्रायोगिक तत्त्वांवर सुरुवातीला ४ बस या मार्गावर धावणार आहेत. ही बससेवा मानसरोवर रेल्वे स्थानकातून सुटणार आहे. त्यानंतर ती मोठी जुई गावाचा कॉर्नर ते पटेल प्लाझा या वसाहतीच्या मुख्य मार्गावरून कामोठे पोलीस ठाणे-जैन पार्क-कावेरी अपार्टमेंटनंतर सेक्टर-६ येथील रयत शिक्षण संस्थेच्या समोरील रस्त्यावरून वामनराव पै यांच्या जीवन विद्या केंद्रासमोरील मार्गावरून बँक ऑफ महाराष्ट्रसमोरील रस्त्यावरून आवाज अपार्टमेंट ते विस्टा कॉर्नर करून ते खांदेश्वर रेल्वे स्थानक अशी असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा