आमदार अमित देशमुख यांनी शहरातील बसस्थानक, अशोक हॉटेल चौकातील मनपाचे शॉपिंग हॉल या कामाचा नुकताच आढावा घेतला. शिवाजी चौकातील बसडेपोच्या ठिकाणी लवकरच नवीन बसस्थानक सुरू करण्याच्या कामास आता गती मिळणार आहे.
आमदार देशमुख यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागीय कार्यालयास भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बाहेरून आलेल्या बसेस शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या दोन नंबरच्या प्रवेशद्वारातून बसस्थानकात जातात. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. त्याऐवजी या बसेस एक नंबरच्या प्रवेशद्वारातून सोडाव्यात. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन सुलभ शौचालयाची व्यवस्था आणखी वाढवावी. शिवाजी चौकातील बसडेपो अंबाजोगाई रस्त्यावरील बसस्थानक दोन येथे स्थलांतरित करून शिवाजी चौकात नवीन बसस्थानक सुरू करावे. विद्यार्थ्यांच्या व प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा चांगल्या रीतीने द्यावी. लातूर तालुक्यात मोठय़ा प्रमाणात बससेवा सुरू करावी आदी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विभाग नियंत्रक डी.बी. माने, आगार व्यवस्थापक युवराज थडकर, शिवाजी देशमुख, लाकाळ पाटील यांची उपस्थिती होती.
शहराच्या अशोक हॉटेल चौकातील यशवंतराव चव्हाण संकुलाच्या मागे मनपाच्या वतीने बीओटी तत्त्वावर बांधण्यात येत असलेल्या शॉपिंग मॉललाही देशमुख यांनी भेट दिली. या मॉलमध्ये जवळपास शंभर दुकाने बांधली आहेत. तळमजल्यावर पार्किंगची सोय आहे. हे मॉल सहा महिन्यांत पूर्णत्वास येतील,    असे देशमुख यांनी सांगितले.

Story img Loader