शहर परिसरात लोकप्रतिनिधींच्या निधीतून अनेक ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी ‘बस थांबे’ बांधण्यात आली आहेत. बसथांब्यांच्या वापरा विना हे थांबे पडीत अवस्थेत आहे. या ठिकाणी गवत, घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर काही ठिकाणी त्यांचे केवळ नाममात्र अस्तित्व शिल्लक राहिले आहे.
शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंसह, नोकरदार, वृध्द, महिलांना दैनंदिन प्रवास करतांना विसावा मिळावा यासाठी लोकप्रतिनिधीनी आपल्या आमदार तसेच खासदार निधीतून काही ठिकाणी बस थांबे तयार केले. ऊन, पाऊस यापासुन संरक्षण मिळवत असतांना वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी हे बस थांबे महत्वपूर्ण भूमिका निभावणार होते. साधारणत एक दशकापूर्वी लोखंडी पत्रे काही खुच्र्या अशा स्वरूपात या बस थांब्याची निर्मिती झाली. त्या ठिकाणी लोकांना वर्तमानपत्रे वाचता यावे असे छोटेखानी फिरते वाचनालयही या ठिकाणी तयार करण्यात आले. नंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत आरामदायी आसनव्यवस्था, मॅटलिक लूक चे बसस्थानक साऱ्यांना खुणावू लागले. मात्र या ठिकाणी काही टारगट मुले, प्रेमी युगूल यांच्यासह काही उपद्रवी माणसांचा वावर वाढल्याने बसेस थांब्यावर थांबत नाही असे कारण देत लोक रस्त्यावरच उभे राहणे पसंत करू लागले. यामुळे हे बसथांबे ओस पडू लागले.
सध्या शहरातील सातपूर-त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमी समोरील बस थांबा पुर्णत मोडकळीस आला आहे. केवळ त्याचा सांगाडा त्याचे नाममात्र अस्तितव शिल्लक आहे. या बसथांब्याचा वापर नजीकच्या झोपडपट्टीतील लोक हे कचरा कुंडी म्हणुन करत आहे. परिसरात पंचायत समितीच्या कार्यालया नजीक असलेला बसथांब्यावर जाहिररातदारांनी कब्जा केला असून विविध कंपन्याची फलकबाजी या ठिकाणी सतत सुरू राहते. मात्र तेथे असलेल्या स्वच्छतेचा अभावामुळे, गैरसोयीने तो बसथांबा तसाच पडीक अवस्थेत आहे. सातपूर आयटीआय येथे काही महिन्यापूर्वी बसथांब्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र दोन महिन्या पासून हे काम रखडले आहे. यामुळे प्रवाशी बसथांबा कधी तयार होणार असा सवाल करत आहे. गांधी नगर परिसरातील बसथांब्याची तर तऱ्हाच निराळी. नाशिक- पुणा रोडवरील गांधीनगर परिसरात आमने सामने असे दोन बस थांबे आहेत. आर्टिलरी सेंटरच्या मुख्य केंद्रालगत असलेला बसथांबा संपुर्णत हिरव्या झाडीत लुप्त झाला आहे. या ठिकाणी भिकारी, जुगाऱ्यांनी आपला अड्डा बनविला आहे. समोरच्या बाजुला असलेल्या बसथांबा वापराविना पडून राहिल्याने त्याची तोडफोड झाली. आसन व्यवस्थेच्या नजीक गवत उगवले आहे. याशिवाय कचराही या ठिकाणी मुबलक प्रमाणात राहतो.
मोरवाडी परिसरातील पेलिकन पार्क येथील बसथांबा पुर्णत मोडकळीस आला आहे. मात्र या ठिकाणी रात्री असणारा गर्दुल्याचा वापर आणि त्याची दुर्दशा यामुळे सिडको वासियांनी याकडे सुरूवातीपासूनच दुर्लक्ष केले आहे. उंटवाडी येथील पेट्रोलपंपनजीक असलेला बसथांब्याचा वापर तेथील अस्वच्छतेमुळे बंद आहे. ठिकठिकाणी बस थांब्याचा पत्रा उखडला आहे. आसनव्यवस्था मोडकळीस आल्याने प्रवाश्यांनी या बसथांब्याला कायमची सोडचिठ्ठी दिली आहे. सीबीएस येथील बसथांब्याचा ताबा तेथील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी घेतला आहे.
बसथांब्यांना प्रतीक्षा नूतनीकरणाची
शहर परिसरात लोकप्रतिनिधींच्या निधीतून अनेक ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी ‘बस थांबे’ बांधण्यात आली आहेत.
First published on: 14-11-2014 at 06:55 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bus stop need restoration