राज्य परिवहन महामंडळाची राज्यातील अनेक आगारे तोटय़ात आहेत. काही आगारे चांगली कामगिरी करत असली तरी तो तोटा भरून काढणे अवघड झाले. त्यामुळे तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने विविध योजना व उपक्रमांचा धडाका लावला आहे. प्रवाशांना एसटी बसकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रमही हाती घेण्यात आले. त्यात ग्राहकांना सौजन्यपूर्वक सेवा, सुरक्षित प्रवासाची हमी, वाजवी दर, आवडेल तिथे प्रवास, इंधन बचतीसाठी प्रयत्न आदींचा समावेश आहे. महामंडळाची प्रमुख शहरांबरोबर काही तालुक्यांच्या ठिकाणी अगदी मोक्याच्या ठिकाणी बसस्थानके आहेत. या जागेचा व्यावसायिक तत्त्वावर वापर करण्यासाठी महामंडळाने आधीपासून प्रयत्न सुरू केले आहेत. बसस्थानकांवरील काही जागा बँकांना ‘एटीएम सेंटर’साठी भाडेतत्त्वावर दिल्यास तोटा भरून काढण्यासाठी हातभार लागू शकतो. ही बाब लक्षात घेत राज्यातील मुख्य शहरातील बसस्थानकांवर बँकांना एटीएम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
महामंडळाचा नाशिक विभागदेखील नफा-तोटय़ाच्या सीमारेषेवर हेलकावे खात आहे. यामुळे नाशिक विभागाने अशा बसस्थानकांवरील जागांची यादी तयार केली. विभागातील नाशिक १ व २, मालेगाव, मनमाड, सटाणा, नांदगाव, इगतपुरी, लासलगाव, कळवण, पेठ, येवला यांसह एकूण १३ आगारांतील ३० बसस्थानकांवरील जागा ‘एटीएम सेंटर’साठी देण्याचे नियोजन केले. ही प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यानंतर त्याची रीतसर जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात आली. एसटी महामंडळाच्या बसस्थानकांवर राष्ट्रीयीकृत वा खासगी बँकांना एटीएम सेंटर सुरू करता येईल, त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. परंतु, या निविदेला एकाही बँकेने प्रतिसाद दिला नाही. बँकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने नाशिक विभागही बुचकळ्यात पडला आहे.
वास्तविक राष्ट्रीयीकृत असो वा खासगी, सर्व बँका बाजारपेठेत प्रमुख अन् वर्दळीच्या ठिकाणी आपले एटीएम सेंटर असावे याची दक्षता घेतात. शहरातील प्रमुख बसस्थानकांवर दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. तसेच ही स्थानके मध्यवर्ती ठिकाणी असूनही बँकांनी प्रतिसाद का दिला नाही, याचे कोडे महामंडळाला उलगडलेले नाही.
एटीएम सेंटरसाठी भाडेतत्त्वावर जागा देण्यामागे महामंडळाचा दुहेरी उद्देश आहे. भाडय़ाच्या माध्यमातून उत्पन्नात भर पडण्याबरोबर प्रवाशांनाही प्रवासादरम्यान मोठी रोख रक्कम जवळ बाळगण्याची जोखीम कमी झाली असती. विभागातील बसस्थानकांवरून दिवसाकाठी लाखो प्रवाशांची वाहतूक केली जाते. यामुळे बसस्थानकावर ही व्यवस्था अनेक घटकांना उपयुक्त ठरणारी आहे. पण असे असूनही खासगी वा सरकारी क्षेत्रातील एकाही बँकेने या जागेत रस दाखविलेला नाही. यामुळे नाशिक विभाग पुन्हा एकदा जाहीर निविदा काढण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
एसटी महामंडळाची गाडी तोटय़ाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी विविध पातळ्यावर प्रयत्न सुरू असले तरी त्यातही काही उपक्रमांत महामंडळाच्या पदरी निराशाच येत आहे. शहरातील बसस्थानकांवरील जागा बँकांना ‘एटीएम सेंटर’साठी भाडेतत्त्वावर देण्याचा उपक्रम, हे त्याचे उदाहरण. या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याचा नाशिक विभागाचा प्रयत्न होता. परंतु त्यास बँकांकडून प्रतिसादच मिळाला नाही. नाशिक विभागाच्या पहिल्या प्रयत्नावर पाणी फिरले असले तरी पुन्हा एकदा त्या दृष्टिकोनातून चाचपणी केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा