एसटी थांबवल्यास आता कारवाई
लोकसत्ता इफेक्ट
नगर-पुणे रस्त्यावरील हॉटेल गंगासागर हा थांबा अनधिकृत असल्याचा व तेथे गाडी थांबवल्यावर चालक-वाहकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देणारा फलकच आज तारकपूर व पुणे स्थानकावर (३ नंबर) एस. टी. महामंडळाच्या नगर विभागाने लावला. या अनधिकृत थांब्यावर गाडी थांबवून होत असलेली आर्थिक पिळवणूक व वेळेचे नुकसान ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणले आहे.
गेले दोन दिवस प्रसिद्ध होत असलेले यासंबंधीचे वृत्त वाचून शिरूर तालुका प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी ‘लोकसत्ता’शी संपर्क साधून प्रवाशांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शिरूरच्या प्रवाशांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. नगरमधून ते शिरूरचे प्रवासी घेतच नाहीत. गंगासागर हे शिरूरच्या अलीकडे आहे. त्यांना तिथे थांबून शिरूरच्या बायपासवरून निघून जायचे असते. एखाद्या प्रवाशाने जास्त आग्रह धरला तर गंगासागर येथे थांबून त्याला मग शिरूरच्या बायपासजवळ रस्त्यावरच उतरवले जाते असे बांडे यांनी सांगितले. पुण्याहून येतानाही शिरूरचे प्रवासी टाळले जातात व पुढे गंगासागरला मात्र गाडी थांबवली जाते अशी माहिती त्यांनी दिली.
प्रवासी संघाच्या वतीने याविरोधात थेट महामंडळाच्या कार्यकारी संचालकापर्यंत पत्रव्यवहार केला, त्यांनी भेटण्यासाठी तारीख कळवतो असे पत्र पाठवले, मात्र नंतर दखल घेतली नाही. नगर-पुणे येथील विभाग नियंत्रक कधी भेटतही नाहीत. हा थांबा अनधिकृत आहे. जागा मालक स्थानिक असला तरी हॉटेल चालवणारा बाहेरचा
आहे.
महामंडळाच्या वरिष्ठांशी संधान बांधून त्याने हा उद्योग सुरू केला आहे. प्रवाशांची त्यात मोठय़ा प्रमाणावर लूट होत आहे व त्याला चालक-वाहकांची साथ मिळत आहे असे बांडे यांनी सांगितले. हॉटेलचे दर व त्याचा दर्जा याबाबतही बांडे यांनी संताप व्यक्त केला, तसेच तो त्याच्या व्यवसायाचा भाग आहे, मात्र सक्तीने तिथे गाडी थांबवून प्रवाशांवर अन्याय करण्याचा एस. टी. महामंडळाला काहीही अधिकार नाही, असे ते म्हणाले.
शिरूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मेहबूब सय्यद यांनीही ‘लोकसत्ता’ने याविरोधात आवाज उठवला म्हणून आनंद व्यक्त केला. मनसेच्या वतीने पुणे, तसेच नगर येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. काही चालक-वाहकांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांना शिरूरला अतिक्रमणे फार झाली आहेत, त्यामुळे गाडी बाहेर काढताना त्रास होतो अशी तक्रार केली, म्हणून त्यांना आम्ही रस्ता मोकळा करून दिला, मात्र तरीही गाडय़ा शिरूरला न आणता बायपासने थेट गंगासागरला नेण्याचा प्रकार सुरूच असल्याने आता याविरोधात शिरूर डेपो बंदचे आंदोलन करणार असल्याचे सय्यद यांनी सांगितले.
दरम्यान, नगरचे विभाग नियंत्रक मिलिंद बंड आजही सर्जेपुरा येथील कार्यालयात नव्हते. त्यांचा मोबाईल फोनही बंदच आहे. कार्यालयीन कामासाठी ते परगावी गेले असून आता थेट सोमवारीच येतील अशी माहिती देण्यात आली. तारकपूर व ३ नंबर स्थानकावर त्यामुळेच आज त्वरित मोठे फ्लेक्स लावण्यात आले. त्यावर महामंडळाची गाडी अधिकृत थांब्याशिवाय अन्यत्र कुठेही थांबवल्यास चालक-वाहकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
 हे फलक प्रवाशांनीही वाचावेत व त्यांनीही चालक-वाहकांना गाडी अनधिकृत थांब्यावर थांबवण्यास विरोध करावा, असे यातून अपेक्षित असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा