ठाणे-बेलापूर मार्गावर मुकंद कंपनी येथील रस्त्याच्या दुतर्फा पदपथ आणि गटाराच्या दुरुस्तीची मोहीम नवी मुंबई महानगरपालिकेने हाती घेतली आहे. एकीकडे पदपथ तयार होत असताना दुसरीकडे मात्र या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचा बसथांबा चक्क चोरीला गेल्याची बाब समोर आली आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या ठेकेदाराने हा बसथांबा सुरक्षित ठिकाणी नेणे अनिवार्य असताना दुर्लक्षितपणामुळे हा थांबा चोरीला गेल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे.
मुकंद कंपनी परिसरातील बेलापूर येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसथांब्यावरील ठाणे आणि मुंबईकडे हजारो कामगार आणि प्रवासी प्रवास करतात. अवघ्या दीड वर्षांपूर्वी परिवहनने लाखो रुपये खर्च करून चांगल्या दर्जाचे बसथांबे उभारले होते; तर या बसथांब्यावरून ऊन, वारा, पावसापासून प्रवासी बसस्टॉपचा आसार घेत उभे राहत असे. दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेच्या ठेकेदाराने या ठिकाणी पदपथ दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मागील १५ दिवसापूर्वी या ठिकाणी असणारा बसथांबा पदपथामुळे हटवण्यात आला. ७ दिवसांपूर्वी यांचे काम पूर्ण झाल्यांनतर बसथांबा नियोजित ठिकाणी बसवणे अनिवार्य होते. मात्र हा बसस्टॉपच चोरीला गेल्याची बाब समोर आली आहे. काम सुरू झाल्यांनतर बसस्टॉप रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आला होता. मात्र नंतर तो रातोरात चोरी झाल्याने प्रवासी हतबल झाले आहेत. याबाबत ठेकेदारला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत येथे नवीन बसथांबा उभारण्यात येणार असल्य़ाची माहिती दिल्याचे नागरिकांनी सांगितले.
मुकंद कपंनीच्या येथे असणारा बसस्टॉप हा पावसाळयामध्ये पावसापासून व उन्हापासून संरक्षण करण्यासाठी चांगला होता. तसेच बस येईपर्यंत बसून वाट पाहता येत होती. परंतु मागील काही दिवसांपासून बस स्टॉपच या ठिकाणी नसल्यामुळे ताटकळत बसची वाट बघावी लागत आहे.
सचिन विनेरकर, प्रवासी
एनएमएमटीचा बसस्टॉप चोरीला गेल्याची माहिती आमच्याकडेदेखील आली आहे. सदर ठेकेदाराला याबाबत नोटीस पाठवून त्याच्याकडून बसस्टॉपची नुकसानभरपाई घेतली जाणार आहे.
शिरीष आरदवाड, व्यवस्थापक,
नवी मुंबई परिवहन विभाग