पनवेल शहरामध्ये नागरिकांच्या हक्काच्या बसथांब्याचा गॅरेजवाल्यांनी दुरुस्तीसाठी शेड म्हणून उपयोग केला आहे. पनवेलवरून उरण फाटय़ावर ये-जा करताना बसथांब्यावर ही वाहने रोज उभी असलेली दिसतात. मात्र येथील थांब्यावरील हे अतिक्रमण पोलिसांच्या नजरेस पडत नाही, तसेच येथून रोज जाणाऱ्या बडय़ा नेत्यांनाही ते दिसत नाही. ‘सब कुछ चलता है’ या उक्तीने सर्व शासकीय यंत्रणा डोळे बंद करून अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करतात.
पंचरत्न हॉटेलच्या चौकातून उरण फाटय़ावरील मासळी बाजाराकडे असणाऱ्या मार्गात हा बसथांबा आहे. मात्र सध्या हा थांबा अतिक्रमणाच्या गर्तेत अडकला आहे. या बसथांब्यासमोर असणाऱ्या गॅरेजवाल्यांनी या थांब्याचा उपयोग वाहने उभी करण्यासाठी केला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना हे रोजचे अतिक्रमण पाहावे लागते. तक्रार करायची कोणाकडे? पंचरत्न हॉटेलच्या चौकात नेहमी वाहतूक पोलीस पावत्या फाडण्यासाठी बसलेले असतात, त्या पोलिसांना हे अतिक्रमण माहीत आहे. मात्र ते पोलीसही या बेकायदा वाहने पार्किगकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, असे येथील नागरिक सांगतात. उरण फाटा हा परिसर वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र पनवेलच्या पंचमुखी मारुती मंदिराशेजारी, उरण फाटा, लाइन आळीचे हनुमान मंदिर, विरुपाक्ष मंदिर या ठिकाणी रोजच दिवसाच्या ठरावीक वेळेत वाहतूक कोंडी होते. मात्र या रोजच्या रडण्यावर उत्तर काढायला पोलिसांकडे वेळ नाही. पोलिसांचे लक्ष टोइंग व्हॅनच्या व्यवसायाकडे लागल्याचे चित्र पनवेलनगरीत पाहायला मिळते.
पनवेलमधील बसथांब्यांचा गॅरेजसाठी वापर
पनवेल शहरामध्ये नागरिकांच्या हक्काच्या बसथांब्याचा गॅरेजवाल्यांनी दुरुस्तीसाठी शेड म्हणून उपयोग केला आहे. पनवेलवरून उरण फाटय़ावर ये-जा करताना बसथांब्यावर ही वाहने रोज उभी असलेली दिसतात.
First published on: 15-05-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bus stop used for garage in panvel