ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) सुमारे ५० ते ६० बसगाडय़ा दररोज किरकोळ कारणांमुळे बंद पडत असल्याची धक्कादायक माहिती परिवहनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या प्रकारामुळे टीएमटीच्या बसगाडय़ांचे वेळापत्रक कोलमडत असल्याने त्याचा थेट फटका प्रवासी वर्गाला बसत आहे. त्यामुळे टीएमटीच्या सेवेविषयी प्रवासीवर्गातून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. तसेच बंद पडणाऱ्या बसगाडय़ांमुळे टीएमटीचा दर्जाही दिवसेंदिवस ढासळू लागला असून प्रवासी वर्ग आता शेअर रिक्षा आणि शहरात सुरू असलेल्या खासगी बसेसकडे वळू लागल्याचे चित्र आहे.
ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात सुमारे तीनशेहून अधिक बसेस असून त्यातील बहुतांश बसेस नादुरुस्त असल्याने आगारात धूळ खात पडल्या आहेत. त्यामुळे सुमारे २०० ते २१० बसगाडय़ा दररोज आगाराबाहेर पडत असून शहरातील वागळे, कोपरी, घोडबंदर, नौपाडा, कळवा आणि मुंब्रा येथील वेगवेगळ्या मार्गावर या बसगाडय़ा धावतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून बसगाडय़ांनाही ग्रहण लागले असून यातील सुमारे ५० ते ६० बसगाडय़ा दररोज पडत आहेत. टायर पंक्चर होणे, गाडी गरम होऊन बंद पडणे, गिअर न पडणे, क्लचप्लेट खराब होणे, लायनर जाम होणे, लोड न घेणे, एअर पकडणे, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे या बसेस बंद पडत असल्याची माहिती परिवहन सेवेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
दररोज बंद पडणाऱ्या ५० ते ६० बसगाडय़ांमध्ये सीएनजी बसचे प्रमाण सर्वाधिक असून या बसगाडय़ा बंद पडताच लॉक होतात, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या सीएनजी बसगाडय़ा आता टीएमटीसाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहे. गुरुवारी रात्री ठाणे स्थानक परिसरातील जुन्या एसटी डेपोसमोरील सॅटीस पुलावर सीएनजी बसगाडी बंद पडून लॉक झाली. त्यामुळे या बसच्या पाठीमागे असलेल्या सर्व बसगाडय़ा अडकून पडल्या. परिणामी, स्थानकात पाऊण तास बस न आल्याने प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच या प्रकारामुळे प्रवासी वर्ग हैराण झाला होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार घडल्याने प्रवाशांनी सॅटीस पुलावरील टीएमटी चौकीची तोडफोड केली होती. तसेच बंद पडणाऱ्या बसेसमुळे शहरातील वाहतूक कोंडीत आणखी भर पडत असल्याचे चित्र आहे.
५०-६० बस बंद पडणे हे तर रोजचेच दुखणे..!
ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) सुमारे ५० ते ६० बसगाडय़ा दररोज किरकोळ कारणांमुळे बंद पडत असल्याची धक्कादायक माहिती परिवहनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या प्रकारामुळे टीएमटीच्या बसगाडय़ांचे वेळापत्रक कोलमडत असल्याने त्याचा थेट फटका प्रवासी वर्गाला बसत आहे.
First published on: 08-09-2012 at 08:16 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bus thane parivahan sevatmt bus