मुख्यमंत्र्यांचे मुत्तेमवारांना  आश्वासन
शहरातील कॉटन मार्केटमध्ये व्यापार संकुल उभारण्यात येणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्याचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी महात्मा फुले फळभाजी आडतिया असोसिएशनच्या शिष्टमंडळाला सांगितले.
शहरातील भाजी बाजाराची मुख्य बाजारपेठ म्हणून महात्मा फुले भाजी बाजार कॉटन मार्केट या नावाने विख्यात आहे. दररोज हजारो लोक भाजी विक्रीसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने जोडलेले आहेत. बेरोजगार युवक, निराधार महिला व भाजी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाची पालनपोषण करीत आहेत. रेल्वेस्थानक व बसस्थानकापासून जवळच्या अंतरावर असलेल्या या बाजाराच्या परिसरातील ८ एकर जागेवर अद्यावत व्यापार संकुल उभारावे, अशी विनंती खासदार मुत्तेमवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनातून केली. नागपूर महापालिकेकडून अद्यावत व्यापार संकुल बांधून देण्यासाठी आडतियांनी १० हजार, ५०० रुपये अनामत शुल्क महापालिकेकडे जमा केले आहे, पण गेल्या आठ वर्षांत कायमस्वरूपी निर्णय झालेला नाही. हा प्रश्न तातडीने निकालात काढून विस्तृत जागेवर व्यापार संकुल उभारावे, अशी विनंती मुत्तेमवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्री चव्हाण यांनी खासदार मुत्तेमवार यांच्यासोबत याबाबत गेल्या शुक्रवारी चर्चा केली. कॉटन मार्केटमध्ये व्यापार संकुल उभारण्यासाठी संबंधितांना लवकरच निर्देश दिले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.  महात्मा फुले फळभाजी आडतिया असोसिएशनच्या शिष्टमंडळाने असोसिएशनचे अध्यक्ष शेख हुसेन यांच्या नेतृत्वाखाली खासदार मुत्तेमवारांनी यांची भेट घेतली असता त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली.  याबाबत व्यापारी, दलाल व आडतियांनी आनंद व्यक्त केला. शिष्टमंडळात असोसिएशनचे सचिव राम महाजन, प्रकाश कुबडे, नसीर भाई, मदन थूल यांचा समावेश
होता.