अहमदनगर एज्युकेशन सोसायटी, ठाणे येथील स्नेहबंध व इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ यांच्या वतीने १ डिसेंबरला शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय प्रबोधन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या उपक्रमाचे यंदाचे सातवे वर्ष आहे. राज्यातील विविध क्षेत्रांतील नामवंतांना या शिबिरासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर, डॉ. आनंद नाडकर्णी व सुनंदा अमरापूरकर हे या मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. या संवादातून मान्यवरांचे अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न असून त्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असा हेतू त्यामागे आहे. यंदा ‘बदलते जग आणि व्यवसाय’ या विषयावर मान्यवरांच्या अनुभव कथनाचा लाभ विद्यार्थ्यांना होईल. अभिनेते, लेखक चेतन सिन्हा, समाजसेविका सुमिता भावे व सुनिल सुखटणकर, चित्रपट दिग्दर्शक तेजस्वी सातपुते, सनदी अधिकारी आदिनाथ दहिफळे, चित्रकार रोहिदास गाडे आदी मान्यवर त्यात सहभागी होणार आहेत.
यंदा या उपक्रमात शहरातील सुमारे २ हजार विद्यार्थी सहभागी होतील, अशी अपेक्षा श्रीमती फिरोदिया यांनी व्यक्त केली. या विद्यार्थ्यांनी शालेय गणवेषात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सर्वश्री धनंजय देशपांडे, जवाहर मुनोत, सुधीर नडिमेटला, अशोक मुथा आदी यावेळी उपस्थित होते. भाऊसाहेब फिरोदिया प्रशालेतील मोने कला मंदिरात हे शिबिर होणार आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा