टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्यूशन्स लिमिटेडने (टीसीपीएसएल) नागपुरात देशातील पहिले व्हाईल लेबल एटीएम नेटवर्क इंडिकॅश दाखल केले आहे. हे एटीएम रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील एटीएम्सच्या व्यापक वापराला चालना देण्याच्या आणि त्यांची पोहोच वाढविण्याच्या ध्येयाचा एक भाग आहे. शहरातील नंदनवनमध्ये इंडिकॅशचे लोकार्पण नुकतेच झाले. फ्रेंड्स कॉलनी चौकातही इंडिकॅश एटीएम लवकरच दाखल होणार आहे. ‘टीसीपीएसएल’ने राज्यात एक हजार एटीएम्स दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुढील तीन वर्षांत देशात १५ हजार इंडिकॅश एटीएम्स दाखल करण्यात येणार आहेत.
एटीएमच्या वापरासंदर्भात उद््भवणाऱ्या विविध समस्या व इतर मुद्दय़ांबाबत टीसीपीएसएलने देशात केलेल्या ग्राहक सर्वेक्षणाच्या आधारे इंडिकॅशची रचना करण्यात आली आहे.  एटीएम नेटवर्कसारख्या पर्यायी बँकींग चॅनेल्सची उपलब्धता असलेले मुंबई आणि पुणेनंतर नागपूर हे देशातील तिसरे मोठे शहर आहे. निवासी व व्यावसायिकांना इंडिकॅशचा लाभ होईल, असे टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्यूशन्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पटेल म्हणाले.
निर्मल उज्ज्वलच्या कळमेश्वर शाखेचा वर्धापन दिन
निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या (मल्टीस्टेट) कळमेश्वर शाखेचा ९ वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आंतरशालेय चित्रकला स्पर्धा व २० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश मानकर यांच्या हस्ते झाले. पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष वसंतराव उरकांदे, उपाध्यक्ष सत्यंजय त्रिवेदी, मुख्याध्यापिका दुर्गे, वामन भलवतकर, डॉ. सुरेखा जिचकार, नंदा बांते उपस्थित होते. चित्रकला स्पर्धेत ९७५ विद्यार्थी सहभागी झाले. परीक्षक म्हणून अशोक देशमुख, लोहकर, चक्रधर फसाते यांनी काम पाहिले. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन रुपाली कोंडेवार यांनी केले.
मॉईल भवनात स्वातंत्र्यदिन उत्साहात
मॉईल लिमिटेडच्या वतीने ६७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. मॉईल भवनात आयोजित कार्यक्रमात वाणिज्य संचालक ए.के. मेहरा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कंपनीच्या विकासात योगदान दिलेल्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.२०२० मध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा पोलाद उत्पादक देश बनले, असे मेहरा म्हणाले. कार्यक्रमाला वित्त संचालक मुकुंद चौधरी, प्रदीप गुप्ता, अनिलकुमार झा, रामावतार देवांगण आदी उपस्थित होते.

Story img Loader