कर्जत शहरात सुरू असलेल्या सुशोभीकरणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अतिक्रमणे हटविण्याबाबत व्यावसायिकांच्या वतीने ग्रामपंचायतीला सर्वाधिकार देण्यात आले आहेत. तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी याबाबत उद्या (गुरूवार) बैठक बोलावली आहे.
कर्जत येथे मुख्य रस्त्यावर सुशोभीकरणासाठी दिवे बसवण्याचे काम सुरू आहे. तसेच रस्ता रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूंची अतिक्रमणे हटवण्याबाबत तहसीलदार भैसडे यांनी ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवून त्यासाठी उद्या बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी अतिक्रमणाबाबत संबंधित व्यावसायिकांना त्यांनी पत्राने कळवले आहे.
त्यामुळे शहरातील व्यवसायिकांमध्ये घबराट पसरली आहे. या पाश्र्वभूमीवर संबंधित दुकानदारांची काल रात्री बैठक झाली. अनेक व्यापाऱ्यांनी या अतिक्रमण मोहिमेला विरोध केला. कर्जत दुष्काळी तालुका असून येथे मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत नाही. रस्त्याची पूर्वीच मोजणी झाली असून आता अतिक्रमणे राहिलेली नाहीत, आहे तो रस्ता पुरेसा आहे. शिवाय बायपास झाल्यास सर्व प्रश्न सुटतील, असे सांगत व्यापाऱ्यांनी आपली बाजू
मांडली.
उपसरपंच नामदेव राऊत म्हणाले की, या अतिक्रमणात कोणीही दुकानदार विस्थापित होणार नाही. तहसीलदारांच्या बैठकीत आपण व्यापाऱ्यांची बाजू मांडू. ही बैठक कोणत्या एका पक्षाची नसून ती पक्षातील व्यापारी बांधव व ग्रामपंचायतीची आहे. त्यातून योग्य तो मार्ग काढण्यात येईल. त्यानंतर अतिक्रमणाबाबतचे सर्व अधिकार ग्रामपंचायतीला देण्याचा ठराव झाला. यावेळी सरपंच सुनंदा पवार, सदस्य अमृत काळदाते, अनिल गदादे, नंदकुमार लांगोरे, सचिन सोनमाळी यांच्यासह व्यापारी तात्या ढेरे, सुरेश खिस्ती, मिलिंद बागल आदी उपस्थित होते.