पाणीटंचाईच्या झळांमुळे करवीर नगरीत दुष्काळग्रस्तांसारखी परिस्थिती उद्भवली आहे. पाण्याचा ठणठणाट कायम राहिल्याने कडक उन्हात नागरिकांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाण्याचा टँकर आला की नागरिकांच्या त्यावर उडय़ा पडत आहेत. आणखी दोनतीन दिवस हीच परिस्थिती राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.         
कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला पुन्हा एकदा गळती लागली आहे. आयटीआयजवळ दोन ठिकाणी गळती लागली असून ती काढण्याचे काम गतीने सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास गुरुवार उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. पाणीटंचाईचे सावट संपूर्ण शहरभर पसरले आहे.     
सोमवारी शहराच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा झाला होता. त्यामुळे पाण्याची तीव्रता फारसी जाणवली नव्हती. मंगळवारी मात्र पाणीटंचाईच्या झळा सर्वाना चांगल्याच झोंबल्या. पाणी उपलब्ध करण्यासाठी भर उन्हात भटकण्याची वेळ नागरिकांवर आली होती. महापालिकेने पर्यायी उपाययोजना म्हणून टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ही उपाययोजना तोकडी पडली आहे. पाणीपुरवठा करणारा टँकर भागात आला की आबालवृद्ध त्या दिशेने धाव घेत आहेत. पाणी प्राप्त करण्यास प्राधान्य दिले जातआहे. उन्हामुळे नेहमीच्या गरजेपेक्षा अधिक पाण्याची आवश्यकता भासत आहे. दुष्काळी भागाप्रमाणे शहरात पाणी मिळविण्यासाठी आटापिटा केला जात आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा