महायुतीच्या पाच पक्षांच्या नेत्यांनी वज्रमुठ आवळून आघाडीविरुद्ध महाएल्गार पुकारला. मात्र, बहुचर्चित माढा मतदारसंघाचा विषय समन्वयाने सोडवण्याच्या घोषणा सर्वच नेत्यांनी केल्यानंतर काही तासांतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी माढय़ातून सदाभाऊ खोत यांची उमेदवारी जाहीर केल्याचे माध्यमांना सांगितले. त्यामुळे या मतदारसंघावर सुरुवातीपासून दावा ठोकणारे रासपचे महादेव जानकर पुन्हा अस्वस्थ झाले आहेत. या घडामोडींवरून माढय़ाच्या जागेविषयी महायुतीत निवडणुकीपूर्वीच तिढा वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी सर्व शक्ती पणाला लावून रविवारी येथे महायुतीची महाएल्गार सभा यशस्वी केली. गेल्या दोन दिवसांपासून माढा मतदारसंघ आपणास मिळावा, या साठी जानकर व शेट्टी यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. या सावटातच हा मेळावा झाला. जानकर या मेळाव्यास येणार का, याचीच उत्सुकता होती. पण जानकर यांनी हजेरी लावून मुंडे यांच्यासह पत्रकार बठकीत माढा मतदारसंघ मिळावा, हा आपला नसíगक हक्क आहे. पण काहीजण हा मतदारसंघ मागून आपल्याला संपवायचेच षड्यंत्र रचत आहेत, असा गंभीर आरोप करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लक्ष्य केले. मात्र, मुंडे यांच्यामुळे आपण महायुतीत आल्यामुळे त्यांनी योग्य मार्ग काढावा. त्यांचा शब्द अंतिम राहील, अशी पुस्तीही त्यांनी जोडून चेंडू मुंडेंच्या कोर्टात टाकला.
जाहीर सभेतही जानकर यांनी माढा मतदारसंघ आपल्याला मिळावा, तो युतीचे नेते देतील, असा विश्वास दाखवत आपली नाराजी उघड केली. यावर शेट्टी यांनी आमच्यात कोणताही वाद नाही, समन्वयाने निर्णय घेऊ, असे सांगत जाहीर भाष्य केले नाही. शिवसेनेचे उद्धव ठाकरे व मुंडे या दोघांनीही माढय़ाचा तिढा आपसांत सोडविण्याची ग्वाही देत मतभेद नसल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर काही तासांतच प्रसारमाध्यमांसमोर बोलताना शेट्टी यांनी माढय़ात आपल्या संघटनेची ताकद असल्याने शेतकऱ्यांनीच सदाभाऊ खोत यांची उमेदवारी जाहीर केल्याचे सांगून एकतर्फी निर्णय घेतल्याचे दाखवले आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांचे नेते माढय़ावर अडून बसल्यामुळे अंतर्गत विसंवाद वाढल्याचे लपून राहिलेले नाही.
जानकर यांनी माढय़ातून मागील निवडणूक लढवली. लोकसभेची एक जागा त्यांनी मागितली. पण ती पूर्ण होत नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपण स्वतंत्र निवडणूक लढवावी आणि युतीतून बाहेर पडावे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Story img Loader