‘जय महाराष्ट्र’चा आम्हाला अभिमान आहे. मात्र, स्वतंत्र विदर्भ हा आमचा आत्मा आहे. स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीशिवाय विदर्भाचा विकास केवळ अशक्य आहे. विदर्भात सर्व प्रकारच्या पायाभूत सोयी उपलब्ध असताना विदर्भाला सतत दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. विदर्भाची मागणी आजची नाही, ती अतिशय प्राचीन आहे. त्यामुळे विदर्भ झाल्याशिवाय येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्याही थांबणार नाहीत आणि औद्योगिक विकास होणारही नाही, असे प्रतिपादन स्वतंत्र विदर्भ राज्याचे कट्टर समर्थक ज्येष्ठ अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी येथे केले.  
लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात आयोजित ‘जाणून घेऊ या स्वतंत्र विदर्भाची आर्थिक व कायदेशीर बाजू’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार दिवाकरराव पांडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेश चव्हाण, अ‍ॅड. रूपेश अमरावतकर, अ‍ॅड. बालाजी येरावार, प्राचार्य डॉ. विनायक भिसे, अ‍ॅड. मुकेश समर्थ उपस्थित होते.
विदर्भ राज्य अतिशय प्राचीन आहे. १८७० साली नागपुरात भोसलेंचे राज्य होते. त्याच वेळी मराठवाडय़ात आजच्या मध्यप्रदेशात व इतरत्र मराठय़ांचे मराठी राज्य अस्तित्वात होते. त्यापूर्वी १८५६ मध्येही सी.पी. अ‍ॅन्ड बेरार नावाने हा प्रांत वेगळा होता. त्यावेळी नागपूर हीच विदर्भाची राजधानी होती. १९२७ मध्ये मद्रास येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाही विदर्भ राज्याचा ठराव पारित झाला होता. याबाबत नेमण्यात आलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, पट्टाभिसितारामेय्या समितीनेही विदर्भाची शिफारस केली होती. न्या. फाजल अली कमिशननेही स्वतंत्र विदर्भ राज्याचा पुरस्कार केला. इतकेच नव्हे, तर घटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही विदर्भाचे अस्तित्व कायम ठेवा, असे सुचविले होते. विदर्भाची आíथक स्थिती चांगली होती आणि आजही नसíगक साधन सामुग्री विपुल असताना सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मुंबईसाठी होती. ती विदर्भासाठी नव्हती, असेही त्यांनी
स्पष्ट केले.
आम्हाला जय महाराष्ट्र म्हणण्याचाही अभिमान आहे, परंतु विदर्भ वेगळा हवा असल्याचे ते म्हणाले.
शहरातील वकिली व्यवसाय आणि उच्चशिक्षण क्षेत्रातील नामवंतांसह सामाजिक चळवळीतील अनेक मान्यवर आणि स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कत्रे यावेळी उपस्थित होते.