संगणकावर एकएक अक्षर टाईप करणे.. स्पेलिंग चुकले तर हेडफोनमध्ये ऐकून चटकन सुधारणे..‘स्क्रीन रीडर’च्या परदेशी ‘अ‍ॅक्सेंट’ची सवय करून घेणे.. या सर्व गोष्टी आता ‘त्या’ सहजपणे करणार आहेत. दृष्टी नसली म्हणून काय झाले, संगणकावर काम करण्याचा त्यांचा उत्साह उदंड आहे. ‘त्या’ आहेत ‘जागृती’ अंध शाळेच्या विद्यार्थिनी!
‘इनरव्हील क्लब पुणे सेंट्रल’तर्फे आळंदीमधील जागृती अंध मुलींच्या शाळेत अद्ययावत संगणक प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत दहा वायरलेस संगणकांचा समावेश असून त्यावरील ‘जॉज फॉर विंडोज’ या सॉफ्टवेअरचा वापर करून येथील अंध मुली संगणकावर वाक्ये टाईप करणे सहजतेने शिकत आहेत.
या प्रयोगशाळेचे मंगळवारी फोर्बज् मार्शल कंपनीच्या संचालक रती फोर्बज् यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. क्लबच्या जिल्हाध्यक्ष रोहिणी वैद्य, अध्यक्ष हुतोक्षी पंडोल, माजी अध्यक्ष बीना श्रॉफ, शाळेच्या प्रकल्प मार्गदर्शक सकीना बेदी या वेळी उपस्थित होत्या.
‘नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाईंड’ या संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या या निवासी शाळेत पहिली ते दहावी इयत्तांत शिकणाऱ्या ११८ अंध मुलींना मोफत शिक्षण
दिले जाते. शाळेच्या वर्गखोल्या लहान असल्याने सध्याच्या शाळेपासून जवळच शाळेची नवीन इमारत बांधण्यास संस्थेने सुरूवात केली आहे. या इमारतीसाठी शाळेला आर्थिक मदतीची गरज आहे.
या प्रयोगशाळेद्वारे विद्यार्थिनींना संगणक सहज हाताळता यावा तसेच भविष्यात शाळेत एमएससीआयटी अभ्यासक्रम सुरू करता यावा असा संस्थेचा मनोदय आहे.
बुद्धिबळात आम्ही अव्वल!
‘जागृती’तील मुली प्रामुख्याने ग्रामीण भागांतून आल्या आहेत. शाळेतील ११८ अंध मुलींपैकी ५० मुली बुद्धिबळ खेळतात. इतकेच नव्हे, तर समाजकल्याण आणि बालकल्याण विभागातर्फे डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धामध्ये अंध प्रवर्गात शाळेने ९ सुवर्णपदके, १५ रौप्य पदके आणि ११ कांस्य पदके पटकावली आहेत.