गेल्या काही वर्षांमध्ये टीकेची धनी ठरलेल्या ठाणे परिवहन सेवेने कासव गतीने बाजी मारत देशामध्ये अव्वल येण्याचा मान मिळविला असून ‘एसआयटीयू’ या संस्थेतर्फे नुकतेच पुरस्कार देऊन तिला गौरविण्यातही आले आहे. कमी अपघात, डिझेलचा कमी वापर आणि वर्षभरात सुमारे ५१ हजार किमी धावल्याची नोंद ठाणे परिवहन सेवेच्या नावावर झाली असून त्यासाठीच हा पुरस्कार परिवहन सेवेला मिळाला आहे.
देशभरात सुरू असलेल्या वाहतूक उपक्रमांचा सव्‍‌र्हे एसआरटीयू या संस्थेमार्फत दरवर्षी करण्यात येतो. मात्र, यंदा संस्थेने तीन वर्षांचा सर्वे केला असून त्यामध्ये देशभरातील वाहतूक उपक्रमाविषयी माहिती संकलित केली आहे. वाहनांच्या अपघातांचे प्रमाण, डिझेलच्या वापराचे प्रमाण तसेच दरदिवशी वाहने प्रति किलोमिटर किती वेगाने धावते, अशी माहिती वाहतूक उपक्रमांच्या सव्‍‌र्हेमध्ये संस्थेने घेतली होती. त्यामध्ये ठाणे परिवहन सेवेच्या बसच्या अपघातांचे तसेच डिझेल वापराचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले. ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात सुमारे तीनशेहून अधिक बसगाडय़ा असून त्यापैकी दोनशे बसगाडय़ा १४० किमी प्रतिदिनी चालविल्याचेही आढळून आले. त्यामुळे संस्थेने यंदाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ठाणे परिवहन सेवेला दिला आहे.
ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात सुमारे तीनशेहून अधिक बसगाडय़ा आहेत. मात्र, प्रत्यक्षात सुमारे दोनशे बसगाडय़ा रस्त्यावर धावतात. उर्वरित बसगाडय़ा नादुरुस्त असल्याने आगारात धूळ खात पडल्या आहेत. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये परिवहन सेवेच्या बसगाडय़ा बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अतिशय खंगलेल्या स्थितीमध्ये सुरू असलेल्या परिवहन सेवेविषयी ठाणेकर फारसे समाधानी नाहीत. मध्यंतरी राजकीय नेतेमंडळही परिवहन सेवा सुधारण्यासाठी पुढे सरसावली होती. मात्र असे असले तरी कासव गतीने का होईना, ठाणे परिवहन सेवेने देशात अव्वल येण्याची बाजी मारली आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

Story img Loader