थकीत कर्ज फेडण्याच्या नावाखाली सहकारी संस्थांच्या मालकीच्या मोक्याच्या जागा मातीमोल भावात विकून स्वत:चे उखळ पांढरे करण्याची टूम तालुक्यात रूढ होऊ लागली आहे. जगदंबा कारखान्याच्या पाठोपाठ आता तालुका खरेदी-विक्री संघाने राशिन येथील एक कोटीपेक्षा अधिक किमतीची जागा काही लाखात विकली आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम देशमुख यांनी त्याला आक्षेप घेतला असून, राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.
तालुका खरेदी-विक्री संघ ही एकेकाळी अग्रेसर सहकारी संस्था होती. संस्थेचे तालुक्यात २ हजार ६५२ सभासद आहेत. या संस्थेचे मुख्यालय मिरजगाव येथे आहे. संस्थेची राशिन तालुका कर्जत येथे करमाळा रस्त्यालगत बिगरशेती १० गुंठे जागा होती. बाजारभावाप्रमाणे या जागेची किंमत कोटीच्या घरात जाते. या भागात १० लाख रुपये गुंठा भाव असताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून ३ लाख रुपये ७५ हजार रुपये गुंठा याप्रमाणे ३७ लाख ५० हजार रुपयांना ही जागा विकल्याची तक्रार देशमुख यांनी केली आहे.
याबाबत संस्थेच्या व्यवस्थापकाकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, संस्थेचे भागभांडवल १० लाख होते ते राहिले नाही. संस्था तोटय़ात आहे. संस्थेकडे जिल्हा बँकेचे ९ लाख ७ हजार एवढे कर्ज आहे. संस्था १२ लाख रुपयांनी तोटय़ात आहे. जिल्हा बँकेचे कर्ज व व्याज थकले आहे, ते भरण्यासाठी जागा विकली. दुय्यम निबंधकांनी ठरवून दिलेल्या किमतीनुसारच हा व्यवहार करण्यात आला.
मात्र या व्यवहारात पारदर्शकता आढळत नाही अशी तक्रार देशमुख यांनी केली आहे. दुय्यम निबंधकांनी १० लाख रुपयांचेच मूल्य काढले होते. या विक्रीची दवंडी गावात देण्यात आली नव्हती, अन्यथा चारपेक्षा अधिक निविदा आल्या असत्या. जाहिरात देताना कमी खपाच्या वृत्तपत्रामध्ये का देण्यात आली. याशिवाय त्याची दवंडी गावात दिली असती तर चारपेक्षा जास्त निविदा आल्या असत्या. सर्वसाधारण सभेत जागा विक्रीला परवानगी घेणे गरजेचे होते, तसे करण्यात आलेले नाही. मिरजगाव येथे ११३ जणांच्या उपस्थितीत बैठक झाली हेच मुळी खोटे आहे. या व्यवहारात संस्था व सभासदांचे हित पाहिलेले नाही आदी आक्षेप देशमुख यांनी घेतले आहेत. या व्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा