भारतीय विद्यार्थी सेनेचे आंदोलन
अकरावी प्रवेश प्रक्रियेत दुसरी यादी गायब करत बिटको महाविद्यालयाने देणगी घेऊन भलत्याच विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थी सेनेने सोमवारी महाविद्यालयाचे प्रवेशद्वार बंद करत ठिय्या दिला. प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आश्वासन महाविद्यालय व्यवस्थापनाने दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या समोरील बिटको महाविद्यालयाने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविताना शिक्षण विभागाच्या निर्देशांचे पालन केले नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली. महाविद्यालयाने प्रवेश प्रक्रियेची दुसरी यादी जाहीर केली होती. परंतु, अवघ्या तासाभरात ही यादी काढून घेण्यात आली.
दरम्यानच्या काळात ज्या विद्यार्थ्यांना अतिशय कमी गुण होते, त्यांना देणगी घेऊन प्रवेश दिल्याचा आरोप भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश बेलदार यांनी केला. परिणामी दुसऱ्या यादीतील सुमारे १२५ ते १५० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले. या संदर्भात तक्रारी आल्यानंतर विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी महाविद्यालयात धडक मारली. संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेराव घालण्यासाठी आलेल्या आंदोलकांना प्राचार्य वा तत्सम अधिकारी भेटले नाहीत. यामुळे संतप्त शिवसैनिकांनी महाविद्यालयाचे प्रवेशद्वार बंद करत तिथे ठिय्या मारला.
काही वेळानंतर संस्थेचे पदाधिकारी दाखल झाले. त्यांच्याशी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते यांनी चर्चा केली. देणगी मिळविण्यासाठी महाविद्यालयाने ८० ते ८५ टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवल्याची तक्रार करण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तुकडय़ा वाढवून देण्याची तयारी दर्शविल्यानंतर महाविद्यालयाने प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास संमती दिली.
या संदर्भात संबंधित प्रतीक्षा यादी पुन्हा जाहीर केली जाणार असल्याचे बेलदार यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा