अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत बिटको महाविद्यालयाने घातलेला घोळ अद्याप मिटला नसून आदल्या दिवशी दिलेल्या आश्वासनानुसार प्रवेश यादी प्रसिद्ध न करता जुनी यादी पुन्हा प्रसिद्ध केल्यामुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मंगळवारी पालकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता महाविद्यालयाने ही प्रक्रिया शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाधीन झाल्याचे सांगून हात झटकले.
अकरावी प्रवेश प्रक्रियेतील दुसरी यादी गायब करून बिटको महाविद्यालयाने देणगी घेऊन भलत्याच विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचा राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटना व पालकांचा आरोप आहे. या निषेधार्थ सलग दोन दिवस संतप्त पालक व विद्यार्थ्यांनी राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.
वास्तविक, शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबतचे निकष आणि वेळापत्रक निश्चित करून दिले होते. परंतु, महाविद्यालयाने त्याचे पालन केले नाही, अशी पालकांची तक्रार आहे. प्रवेश प्रक्रियेत काही दिवसांपूर्वी जाहीर केलेली दुसरी गुणवत्ता यादी काही तासात गायब करण्यात आली. त्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश न देता देणगी स्वीकारून अतिशय कमी गुण असणाऱ्यांना प्रवेश दिल्याचा आरोप होत आहे. या पाश्र्वभूमीवर, भारतीय विद्यार्थी सेनेने महाविद्यालय व्यवस्थापनाला धारेवर धरल्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी तुकडय़ा वाढवून देण्याची तयारी दर्शविली आणि महाविद्यालयाने
दुसरी यादी पुन्हा प्रसिद्ध करण्याचे मान्य केले. त्यानुसार मंगळवारी ही यादी प्रसिद्ध होईल,
या अपेक्षेने आलेल्या विद्यार्थी व पालकांचा
भ्रमनिरास झाला.
महाविद्यालयाने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची पहिलीच यादी पुन्हा जाहीर केली. ही बाब काही जणांच्या लक्षात आल्यावर त्यांनी विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. किती प्रवेश झाले, याची माहिती दिली गेली नसल्याचा पालकांचा आक्षेप आहे.
प्रवेश प्रक्रियेविषयी तक्रारी झाल्यामुळे सर्व कागदपत्रे शिक्षण विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील प्रक्रिया त्यांच्यामार्फत पार पाडली जाईल, असे सांगत महाविद्यालयाने हात झटकले. यामुळे काही पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले.
या विभागाने मंगळवापर्यंत किती प्रवेश झाले याची छाननी करून शिल्लक राहणाऱ्या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतील, असे सांगितले आहे. या घडामोडींमुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरीच राहिल्याचे दिसत आहे.

Story img Loader