पुण्यात जरी महाराष्ट्रीयन पद्धतीच्याच नवरात्री उत्सवाचे प्रस्थ असले तरी बंगाली दुर्गापूजाही शहरात ठिकठिकाणी केली जाते. बंगाली पद्धतीचा नवरात्री उत्सव अर्थात ‘दुर्गापूजा’ ललिता पंचमीपासून सुरू होत असल्याने या मूर्तीवर अखेरचा हात फिरविणे अद्याप बाकी आहे. विशेष म्हणजे एक मूर्तिकार गेली तब्बल बत्तीस वर्षे कोलकात्याहून खास नवरात्री उत्सवासाठी पुण्यात येऊन या मूर्ती बनवतो.
या मूर्तिकाराचे नाव केष्टो पाल. सध्या पाल यांच्याकडे सहा कारागीर आहेत. ही सर्व मंडळी दरवर्षी कोलकात्याहून गंगा नदीकाठची माती घेऊन पुण्यात येतात. इथे राहून अनेक दिवसांच्या परिश्रमांतून बनतात ‘दुर्गा माँ’च्या मूर्ती. गेली बत्तीस वर्षे पाल हे काम त्याच निष्ठेने करीत आहेत.
दुर्गामातेच्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील भावच नव्हे तर या मूर्तीची भव्यताही बघण्यासारखी असते. ‘देवी माँ’च्या पायाखाली महिषासुर, देवीच्या डाव्या बाजूला लक्ष्मी आणि गणपती, उजव्या बाजूला सरस्वती आणि कार्तिकेय असा हा भव्य देखावाच असतो. देवदेवतांबरोबरच त्यांची वाहने, म्हणजे लक्ष्मीचे घुबड, गणपतीचा उंदीर, सरस्वतीचा हंस आणि कार्तिकेयाचा मयूर हीदेखील या मूर्तींची वैशिष्टय़े. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मूर्ती पूर्णपणे ‘इको फ्रेंडली’ असतात. मूर्तीचा महत्त्वाचा घटक म्हणजे वाळलेले गवत. गवत, बांबू, गोणपाटाचे कापड, सुतळी अशा वस्तू वापरून मूर्तीचा साचा बनतो. त्यावर लाल मातीचा थर दिला जातो आणि बाहेरून गंगाकाठच्या पांढऱ्या मातीचा हात फिरविला जातो. मूर्तीची वस्त्रे, साडय़ा पुण्यातच खरेदी केल्या जातात. तर दागिने, मूर्तींच्या हातातील शस्त्रे इत्यादी गोष्टी कोलकात्याहून मागवल्या जातात.
ललिता पंचमीला बंगाली नवरात्री उत्सवाची घटस्थापना होते. तर सप्तमीला देवीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. सप्तमी ते दशमी हे तीन दिवस या उत्सवात महत्त्वाचे समजले जातात.
पाल कोलकात्यात वर्षभर मूर्ती बनविण्याचाच व्यवसाय करतात. बंगालमध्ये नवरात्रीनंतर लक्ष्मी पूजा, जगदत्ती पूजा, काली पूजा, कार्तिकेय पूजा असे विविध उत्सव पाठोपाठ साजरे होत असल्याने वर्षभर सतत काम असल्याचे पाल सांगतात. कोलकात्यात व्यवसाय यशस्वीपणे चालला असतानाही दुसऱ्या राज्यात जाऊन, तिथल्या बांधवांसाठी मूर्ती साकारण्याची त्यांची वर्षांनुवर्षांची निष्ठा वाखाणण्यासारखी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा