अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात भ्रमणध्वनी वा संगणकाची कळ दाबताच चटकन माहिती समोर येत असतांना महानगरपालिकेने कुंभपर्वाचे विपणन करण्यासाठी आधुनिकतेसह पारंपरिक पध्दतीचा अवलंब करण्याचे ठरविले आहे. अत्याधुनिक ‘अॅप्स’ सोबत महापालिकेचे ‘कॉल सेंटर’ २४ बाय ७ च्या धर्तीवर कुंभपर्वात सक्रिय राहणार आहे. या संदर्भातील काम अंतिम टप्प्यात असले तरी भाविक तसेच पर्यटकांसाठी अद्याप दूरध्वनी क्रमांक उपलब्ध झालेले नाहीत. एप्रिल किंवा मे अखेपर्यंत हे क्रमांक उपलब्ध होतील अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.
अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कुंभपर्वात ८० लाखपेक्षा अधिक भाविक, पर्यटक विविध पर्वण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. मागील कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. यंदा कोणतेही विघ्न न येता हा सोहळा नेटका पार पडावा, महोत्सवाला कुठलेही गालबोट लागू नये यासाठी महापालिकेसह विविध विभाग सक्रिय आहेत. पालिकेने कुंभपर्वात बाहेरून येणारे पर्यटक व भाविकांना नाशिकबद्दल हवी ती माहिती देण्यासाठी स्वतंत्र ‘कॉल सेंटर’ सुरू करण्याचे ठरविले आहे. यासाठी पालिकेच्या मूळ कॉल सेंटर विभागात काही बदल करण्यात आले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत सर्व माहिती अद्ययावत करून घेण्यात आली आहे. यामध्ये नाशिकमध्ये असणारी पर्यटनस्थळे, त्या ठिकाणी उपलब्ध सोयी सुविधा, वाहतूक, धार्मिक स्थळे, शहरातील प्रसिध्द व्यक्ती, त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक तसेच पर्यटन स्थळे, नकाशे आदी माहिती उपलब्ध राहणार आहे. कुंभपर्वात विविध अधिकाऱ्यांची झालेली नियुक्ती, विभाग प्रमुख, त्यांच्याशी कसा संपर्क करता येईल, आपत्कालीन कक्षाची मदत कशी मिळवली जाईल आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचवेळी पालिकेच्या विविध विभागांची माहिती, त्यांच्या योजना याविषयी नागरिकांना अवगत करण्यात येईल.
दरम्यान, कुंभ पर्वात साधुग्राम, गोदाकाठ, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पालिकेच्यावतीने माहिती देण्यासाठी छोटे छोटे केंद्र सुरू राहतील. या केंद्रांच्या माध्यमातून कुंभ पर्वात नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आवश्यक माहिती देणे, या कामात समन्वय साधणे आदी कामे कॉल सेंटरकडून होणार आहेत. तसेच भाविक किंवा पर्यटकांकडून काही तक्रार आल्यास त्या त्या विभागांकडे ती वर्ग करण्यात येईल. पर्वणीसह संपूर्ण कुंभपर्वात हे कॉल सेंटर २४ तास सुरू राहणार आहे. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ प्रतीनियुक्तीवर घेण्यात येईल अशी माहिती संगणक विभाग प्रमुख पी. बी. मगर यांनी दिली.
कॉल सेंटरचे काम अंतिम टप्प्यात असले तरी, मदत वाहिनीसाठी आवश्यक क्रमांक अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. हे क्रमांक मिळाल्यावरच कॉल सेंटरचे पुढील काम सुरू होईल.
‘कॉल सेंटर’ क्रमांकासाठी एप्रिलपर्यंत प्रतीक्षा
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात भ्रमणध्वनी वा संगणकाची कळ दाबताच चटकन माहिती समोर येत असतांना महानगरपालिकेने कुंभपर्वाचे विपणन करण्यासाठी आधुनिकतेसह पारंपरिक पध्दतीचा अवलंब

First published on: 25-03-2015 at 08:53 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Call center for kumbh mela in nashik