समृध्द अशा निफाड तालुक्यासही यंदा कमी पावसामुळे टंचाईचे चटके बसू लागले असून भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने द्राक्षबागा वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. शेतकऱ्यांनी पालखेड कालव्याच्या आवर्तनामुळे मिळालेल्या पाण्याचे काटकसरीने नियोजन करून आपल्या द्राक्षबागा वाचविण्याची सूचना आ. अनिल कदम यांनी केली आहे.
पालखेड कालवा लाभक्षेत्रातील आहेरगाव, कुंभारी, उगाव, नैताळे या गावातील शेतकऱ्यांच्या बैठकीत आ. कदम यांनी पाण्याचे काटकसरीने नियोजन करण्याचे आवाहन केले. बैठकीस पालखेड विभागाचे उपअभियंता एन. एम. पाटील, शाखा अभियंता इ. ए. शेख, डी. एस. लोहारकर आदींसह पिंपळगावचे विद्युत वितरणचे सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, निफाडचे कनिष्ठ अभियंता यांच्यासह पालखेड कालव्यालगत असणाऱ्या गावातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पालखेडच्या आवर्तनामुळे द्राक्षबागा वाचविण्यासाठी मदत होणार असून शेतकऱ्यांनी पिकाला पाणी जाण्यासाठी पाटबंधारे विभागाला सहकार्य करण्याची गरज आहे. योग्य समन्वय राखला गेला तरच सर्वाना पाणी मिळणार असून बुधवारपासून पाच दिवस द्राक्षबागांसाठी पाणी देण्यात येणार असल्याची माहिती आ. कदम यांनी दिली.
यावेळी शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा पाढा आमदारांसमोर वाचला. आमदारांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. आवर्तन काळात वीज प्रवाह खंडित न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अपुरा पाणीपुरवठा, रोहित्र बंद, लोंबकळणाऱ्या वीजतारा यांसह अवाजवी वीज बिले आणि वीज पुरवठा खंडित करण्याच्या असंख्य तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा