राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने गोंडवाना विद्यापीठात प्रतिनियुक्तीवर पाठवलेल्या सात कर्माचाऱ्यांना परत बोलावल्यामुळे दोन्ही विद्यापीठात शीतयुद्ध सुरू झाले आहे.
नऊ महिन्यांपूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने गोंडवाना विद्यापीठात आठ कर्मचारी दोन वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर पाठवले होते, त्यापैकी बी.एस. राठोड यांची नियुक्ती कायमस्वरूपी
आहे.
नागपूर विद्यापीठ प्रशासनाने त्या सातही कर्मचाऱ्यांना परत बोलावले, परंतु मुदत पूर्ण होईपर्यंत कर्मचाऱ्यांना परत बोलावू नका, असे आदेश गोंडवाना विद्यापीठाचे कक्ष अधिकारी कदम यांनी नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवांना दिले. त्यामुळे संतप्त झालेले नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अशोक कदम यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांकडे याबाबत तक्रार केली. गोंडवाना विद्यापीठात हे कर्मचारी पदोन्नतीवर गेले होते, परंतु परत बोलावल्यामुळे त्यांना पदोन्नती व पगारवाढीचा लाभ मिळणार नसल्याने त्या कर्मचाऱ्यांचा आनंद हरवला आहे.
नक्षलग्रस्त भागातील गोंडवाना विद्यापीठात कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कर्मचाऱ्यांना परत बोलावणे उचित नसल्याचे पत्रात म्हटले आहे. गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते विदेश दौऱ्यावर असून गोंडवाना विद्यापीठाचे कर्मचारी त्यांच्या परत येण्याच्या प्रतीक्षेत  आहेत.  

Story img Loader