ठाणे शहरात बेकायदा फेरीवाल्यांचा अक्षरश: सुळसुळाट सुरू असताना त्यावर ताबा मिळविण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या महापालिका प्रशासनाने यापुढे शहरातील प्रमुख नाक्यांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवून त्याद्वारे फेरीवाल्यांवर नियंत्रण राखण्याची योजना आखली आहे. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेने पोलिसांच्या माध्यमातून सीसी टीव्ही बसविण्याची योजना आखली आहे. यासाठी काही कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हे पैसे कोठून उभे करायचे याविषयी महापालिका वर्तुळात वेगवेगळे मतप्रवाह असतानाच फेरीवाल्यांच्या नियंत्रणासाठीही हे कॅमेरे उपयोगात आणले जावेत, असा प्रयत्न आहे.
२६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील हल्ल्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविले जावेत, अशा स्वरूपाचा प्रस्ताव पुढे आला. नवी मुंबई महापालिकेने यासाठी सर्वात आधी पुढाकार घेत काही कोटी रुपये खर्च करून पोलिसांच्या साहाय्याने शहराच्या प्रमुख नाक्यांवर असे कॅमेरे उभारले. मुंबई, ठाण्यातही अशा स्वरूपाचे कॅमेरे बसविले जावेत, यासाठी प्रस्ताव आखण्यात आले आहेत. दरम्यान, ठाणे रेल्वे स्थानक परिसरात आमदार निधीच्या माध्यमातून अशा स्वरूपाचे कॅमेरे बसविले गेले असले तरी इतर प्रमुख नाक्यांवरही सीसी टीव्ही कॅमेरे बसविले जावेत, अशा स्वरूपाचा प्रस्ताव ठाणे पोलीस आयुक्तालयाने महापालिकेपुढे ठेवला आहे. यासाठी शहरातील ५५० ठिकाणे निश्चित करण्यात आली असून त्यासाठी १०० कोटींपेक्षा अधिक रकमेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ही रक्कम उभारण्यासाठी राज्य सरकारने साहाय्य करावे, अशा स्वरूपाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने ठेवला आहे.
फेरीवाल्यांवरही नजर
शहराच्या सुरक्षेसाठी असे कॅमेरे बसविण्याची योजना एकीकडे आखली जात असताना फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण रोखण्यासाठीही हे कॅमेरे उपयोगात आणण्याचा ठाणे महापालिकेचा प्रयत्न आहे. आर. ए. राजीव यांच्याकडे ठाणे महापालिकेचे आयुक्तपद असताना त्यांनी बेकायदा फेरीवाल्यांना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना अमलात आणल्या होत्या. मात्र, विद्यमान आयुक्त असीम गुप्ता यांच्या काळात बेकायदा फेरीवाल्यांचा पुन्हा एकदा सुळसुळाट झाला असून अतिक्रमण विरोधी पथकाच्या नाकर्तेपणामुळे प्रमुख रस्त्यांच्या कडेला फेरीवाले दिसू लागले आहेत. ठाणे रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी राजीव यांनी विशेष प्रयत्न केले होते. मात्र, गुप्ता यांच्या काळात रेल्वे स्थानक आणि सॅटिस पुलावरही फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे. मुंब्रा, कळवा या शहरांमध्ये तर फेरीवाल्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही, अशी स्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर शहरातील प्रमुख नाक्यांवर फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरे उपयोगात आणले जातील, असा दावा महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिला. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नेमके कोणत्या भागात कॅमेरे बसवावेत, यासंबंधीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखडय़ाची अंमलबजावणी करताना फेरीवाल्यांचा उपद्रव रोखण्याचाही प्रयत्न केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
ठाण्यात फेरीवाल्यांवरही कॅमेऱ्यांची नजर
ठाणे शहरात बेकायदा फेरीवाल्यांचा अक्षरश: सुळसुळाट सुरू असताना त्यावर ताबा मिळविण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या महापालिका प्रशासनाने यापुढे शहरातील
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-04-2014 at 07:02 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cameras eyes on thane peddlers