संक्रमण शिबिरात राहणाऱ्या पात्र रहिवाशांची यादी तयार करण्याचे काम म्हाडाने हाती घेतल्यानंतर आलेल्या अर्जामुळे घुसखोरांची संख्या ८२८२ या अधिकृत आकडेवारीपेक्षा अधिक असल्याचे चित्र समोर आले आहे. ही संख्या सुमारे दहा हजारांहून अधिक आहे, असा प्राथमिक अंदाज आहे. म्हाडाची मुंबईमध्ये ५६ संक्रमण शिबिरे आहेत. त्यात एकूण २०,६६१ घरे आहेत. त्यापैकी १८६५ रिकामी आहेत. तर १८,७९६ घरांमध्ये रहिवासी आहेत. संक्रमण शिबिरात राहणाऱ्या पात्र रहिवाशांना पुनर्विकास प्रकल्पात घरे मिळणार आहेत. त्यासाठी पात्र रहिवाशांची यादी तयार करण्याचे काम म्हाडाने हाती घेतले आहे. या यादीसाठी रहिवाशांकडून अर्ज मागवले असता केवळ ७,७३३ अर्ज म्हाडाकडे आले. म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील १८,७९६ घरांमध्ये रहिवासी असताना केवळ ७,७३३ अर्ज आल्याने म्हाडाचे अधिकारी चक्रावले. म्हाडाच्या अधिकृत आकडेवारीनुसार म्हाडाच्या संक्रमण शिबिरांत ८२८२ घुसखोर आहेत. त्या हिशेबाने किमान १२ हजार लोकांचे अर्ज यायला हवे होते. पण आठ हजारपेक्षा कमी अर्ज आल्याने घुसखोरांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. संक्रमण शिबिरांत बृहन्मुंबई महानगरपालिका, विविध प्रकल्पग्रस्त, म्हाडाचे कर्मचारी यांनाही घरे देण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांची संख्या जरी गृहीत धरली तरी ‘म्हाडा’च्या संक्रमण शिबरांत दहा हजारांपेक्षा अधिक घुसखोर असतील, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पात्रता यादी निश्चित करण्याचे काम डिसेंबरअखेपर्यंत संपेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे एकदा ती यादी जाहीर झाली की ‘म्हाडा’च्या संक्रमण शिबरांत घुसखोर नेमके किती हे समोर येईल. पण ती संख्या निश्चितच आधीच्या संख्येपेक्षा जास्त असेल, असे सांगण्यात आले.

Story img Loader