जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सावरीकर संस्थानिक असल्यासारखे वागत आहेत. त्यांच्या मनमानी, नियोजनशून्य कारभारामुळे जिल्ह्यात विकासकामांना खीळ बसली आहे, अशी तोफ डागत सर्वपक्षीय सदस्यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांच्याप्रमाणेच आता सावरीकर यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. सावरीकर यांच्याविरोधात शुक्रवारी १५ सदस्यांनी लेखी तक्रार केली.
गेल्या दिवाळीपूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रगोत्री यांच्यावर आरोप करीत सत्ताधारी राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेस सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. त्यामुळे मित्रगोत्री यांना परभणी सोडावे लागले. त्यांच्या जागी सावरीकर यांची नियुक्ती झाली. सध्या सावरीकर यांनी ग्रामपंचायत, जि.प. शाळा, समाजकल्याण वसतिगृह यांची तपासणी करून दोषींवर कारवाईचा धडाका लावला आहे.
सावरीकर यांच्याविरोधात बहुतांश सदस्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. सदस्यांना ते विश्वासात घेत नाहीत. त्यांची नकारात्मक भूमिका असते. कामात निष्काळजीपणा व नियोजनशून्यता असल्याचा गंभीर आरोपही सदस्यांनी केला. दलितवस्ती सुधार योजनेचे २०१३-१४चे नियोजन अजून केले नाही. जि.प.च्या स्वनिधीतून गरजूंना टिनपत्रे, वीज मोटारींचे वाटप झाले नाही. शिक्षकांचे अयोग्य समायोजन व आंतरजिल्हा बदली प्रकरणात निर्णय न घेतल्याने शिक्षकांची ३०८ पदे रिक्त आहेत. जिल्हा नियोजन समिती माध्यमातून मिळालेल्या ४१ कोटी निधीपकी २०१३अखेर केवळ १२ कोटी खर्च झाले. आगामी निवडणुकांच्या आचारसंहितेत उर्वरित २९ कोटी निधी अखर्चित राहण्याची शक्यता या तक्रारीत नमूद केली आहे.
अध्यक्ष-उपाध्यक्षांकडे तक्रार करूनही सावरीकर यांच्या वागण्यात बदल झाला नाही. त्यामुळे सदस्यांमध्ये अविश्वास, संभ्रम असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारअर्जावर डॉ. जगन्नाथ जाधव, गंगाधर कदम, रामेश्वर जावळे, आम्रपाली धूतराज, शीला काकडे, कौशल्या मुंडे, गिरजाबाई पुंजारे, संजीवनी वटाणे, वैशाली जाधव, संगीता सानप, भरत घनदाट, देवीदास मूलगीर, मीना राऊत, उज्ज्वला राठोड व  संजीवनी नाईकवाडे यांच्या सहय़ा आहेत.

Story img Loader