वन विभाग व भारतीय वन्यजीव संस्थेचा तडाखा
वन विभाग व भारतीय वन्यजीव संस्थेची नोटीस मिळताच महानगरपालिकेने मोकाट कुत्रे पकडण्याच्या मोहिमेला तुर्तास पूर्णविराम दिलेला आहे. मनपाने मोकाट कुत्रे ताडोबात सोडल्याने वाघ व अन्य वन्यप्राण्यांना ‘कॅनीन डिस्टेम्पर व्हॉयरस’ ची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याची दखल बीबीसीसह सर्व प्रमुख माध्यमांनी घेतल्यानंतर मनपाने ही स्थगिती दिली.
या शहरात मोकाट कुत्र्यांनी सध्या धुमाकूळ घातलेला आहे. कुत्र्यांमुळे लोक त्रस्त झाल्याचे बघून महापौर संगीता अमृतकर यांनी मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करा, असे निर्देश मनपा आयुक्त प्रकाश बोखड यांना दिले होते. जोवर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होणार नाही आणि कुत्र्यांसाठी कुत्तागाडी येणार नाही, तोवर स्वत:च्या गाडीत बसणार नाही, अशी शपथ महापौरांनी घेतली होती. महापौरांचे आदेश प्रमाण मानून आयुक्त बोखड यांनी शहरातील मोकाट कुत्रे पकडण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली. त्यानंतर स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी यांच्या नेतृत्वाखाली कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू झाली.
शहरातील मोकाट कुत्रे पकडायचे आणि ताडोबालगतच्या लोहारा व घंटाचौकीच्या जंगलात नेऊन सोडायचे, असा दिनक्रम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होता. कुत्र्यांमुळे ‘कॅनीन डिस्टेम्पर व्हॉयरस’ हा विषाणू निर्माण होऊन वाघ व अन्य वन्यप्राण्यांचा मृत्यू होण्याची भीती भारतीय वन्यजीव संस्थेने व्यक्त केली. जागतिक पातळीवर या विषाणूची गंभीर दखल घेतल्यानंतर भारतीय वन्यजीव संस्थेनेही देशभरातील वनखात्याच्या कार्यालयांना पत्र पाठवून जंगलात कुत्रे सोडण्यास सक्त मनाई केली, तसेच नगर पालिका किंवा महापालिकेच्या वतीने कुत्रे सोडले जात असतील तर वन कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले.
महापालिका शहरातील मोकाट कुत्रे ताडोबालगतच्या जंगलात सोडत असल्याची बाब ग्रीन प्लॅनेट सोसायटीने उघडकीस आणली. त्यानंतर चंद्रपूर वन विभागाचे विभागीय वन अधिकारी एन.डी. चौधरी यांनी मनपा आयुक्त प्रकाश बोखड यांना पत्र लिहून कुत्रे जंगलात सोडण्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले. मनपाच्या वतीने जंगलात कुत्रे सोडले जात असल्याच्या वृत्ताची दखल बीबीसी व अन्य माध्यमांनी ठळकपणे घेतली. त्यानंतर वनखाते व भारतीय वन्यजीव संस्थेची नोटीस मिळताच आता महापालिकेने मोकाट कुत्रे पकडण्याच्या मोहिमेला तुर्तास पूर्णविराम दिलेला आहे. सोमवारपासून ही मोहीम बंद करण्यात आली असल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. कुत्रे पकडण्याच्या मोहिमेतील कर्मचारी इतरत्र वळते करण्यात आले, तसेच कुत्तागाडीही महापालिकेच्या आवारात लावण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम बंद केल्याने लोकांना त्रास होत असल्याचे मडावी यांनी सांगितले. दरम्यान, ताडोबा व लगतच्या परिसरातील वाघ किंवा बिबटय़ाला कॅनीन डिस्टेम्पर व्हॉयरसची लागण झाली असेल आणि तसे निदर्शनास आले तरी आम्ही महापालिकेवर कारवाई करू, असे विभागीय वन अधिकारी चौधरी यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यामुळे वनखात्याचे पथकही या कुत्र्यांवर लक्ष ठेवून असल्याची माहिती त्यांनी दिली

Story img Loader