दत्त साखर कारखान्याचे मालक असणाऱ्या सभासदांनी, कर्मचारीरूपी वानर सेनेने बँकरूपी लंकेला जाळायचे असेल तर चळवळीचा सेतू बांधून बँकरूपी लंकेतील रावणाचा वध करायला हवा. सत्याच्या मार्गाने चळवळ उभारून कारखाना मिळवू या, असा इशारा गणपतराव सरनोबत यांनी दिला.
पन्हाळा तालुक्यातील पोले येथील मसाई मंदिर पोर्ले येथे गणपतराव सरनोबत सरकार यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त सह. साखर कारखाना बचाव कृती समितीची सभा कारखान्याचे पुढील धोरण ठरविण्याकरिता आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते.
श्री दत्त कारखाना आसुर्ले-पोर्ले हा केडीसीसी बँकेने आपल्या कर्जापोटी प्रथम अवसायनात काढून नंतर भाडेपट्टीवर चालवावयास दिला. त्यातूनही काही
निष्पन्न झाले नाही म्हणून कारखाना विक्रीस काढला, तो दालमिया ग्रुप दिल्ली यांनी घेतला. कारखान्याची परिस्थिती व त्यास दिलेले तोंड याकरिता
ही सभा वेळोवेळी होते. कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा यासाठी सरकार दरबारी वेळोवेळी निवेदन देऊन त्यास दाद मिळाली, असे परशुराम चोपडे यांनी प्रास्ताविक केले.
गणपतराव सरनोबत आपल्या भाषणात पुढे म्हणाले, ज्या प्रकारे राजाराम कारखाना खासगी होता तो जसा सहकारी झाला
तशा प्रकारे लढा देऊन हा कारखाना वाचवूया, त्याकरिता मोठय़ा प्रमाणात चळवळ उभी करावी लागणार आहे. कारखाना कार्यस्थळावर लवकरच एक मोठा शेतकरी मेळावा घेणार आहे; पण लोकांच्या मनात अशी संभ्रमावस्था आहे की, कारखाना आता विकला आहे. तो सभासदांच्या मालकीचा होणार का?
पण याकरिता सर्वानी पुढाकार घेतला पाहिजे.यावेळी बी. एच. पाटील आणि दगडू पाटील यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. या सभेला सर्जेराव पाटील, डी. जी. पाटील, राजाराम पाटील, जर्नादन पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, परशुराम सुरे, शिवाजी चेचर, दाजी चौगले, राऊ काशिद, खुडे महाराज, देवाप्पा काशीद, नंदू गुरव, श्रीकांत जमदाडे, जोतीराम शेळके, सभासद, शेतकरी आणि कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.    

Story img Loader