अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन दिल्याने कुपोषण निर्मूलन ट्रस्टच्या खात्यावर जवळपास ७० लाख रुपये जमा झाले. या पुंजीवर तीव्र कमी वजनाच्या १ हजार ६०० बालकांसाठी काय उपाययोजना करायच्या? या विषयावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांनी बैठक घेतली.
राज्यात कुपोषित बालकांची संख्या मोठी आहे. मात्र, लातूर जिल्हय़ात विविध उपक्रम राबविल्याने कुपोषणमुक्तीत हा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन कुपोषणमुक्तीसाठी दिल्याने लातूर जिल्हा या अभियानात पहिल्या स्थानावर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हय़ात शून्य ते सहा वयोगटातील बालकांची संख्या १ लाख ७९ हजार आहे. पैकी १ लाख ६२ हजार बालके सुदृढ श्रेणीत, तर ८ हजार मध्यम श्रेणीत आहेत. एक हजार ६०० बालके तीव्र कमी वजनाची आहेत. याचा अर्थ दीड हजार बालके कुपोषित आहेत. या बालकांना विशेष सकस आहार देऊन त्यांना सुदृढ श्रेणीत आणण्यास प्रयत्न केले जाणार आहेत.
सामाजिक बांधिलकीचा लातूर पॅटर्न लातूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी निर्माण केला आहे. असा पॅटर्न राबविणारी लातूर जिल्हा परिषद एकमेव आहे. नन्नावरे यांनी आयोजित केलेल्या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर, समाजकल्याण सभापती बालाजी कांबळे, कृषी सभापती चंद्रकांत मद्दे, महिला व बालकल्याण सभापती प्रतिभा पाटील, आरोग्य सभापती कैलास पाटील आदी उपस्थित होते.