आघाडीचे उमेदवार राहुल नार्वेकरांच्या पनवेलमधील प्रचार कार्यालयाचे गुरुवारी सायंकाळी उद्घाटन झाले. नियोजनाअभावी  शिवाजी चौकात वाहतूक कोंडी, रस्त्यावर उद्घाटनासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी खुर्च्या घेऊन ठिय्या मांडल्याने पनवेलच्या सामान्य नागरिकांना मात्र या गर्दीतून वाट शोधत मार्गक्रमणा करावी लागली. नार्वेकरांचे प्रचार कार्यालय थाटून आघाडीने राजकीय फलित साधले, मात्र नागरिकांची चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र या वेळी पाहायला मिळाले. शिवाजी चौकातून कचेरीकडे जाणाऱ्या मार्गावर ही छोटीशी सभा आयोजित केली होती. काँग्रेसचे रामशेठ ठाकूर, त्यांचे पुत्र आमदार प्रशांत ठाकूर आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांचे विचार ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी होणार होती; परंतु या गर्दीचा अंदाज आघाडीचे नियोजनकार बांधू शकले नाहीत. यामुळे शिवाजी चौकाशेजारील उद्यानात सायंकाळी बागेत जाण्यासाठी फुटपाथवर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांमधून वाट काढून निसर्गप्रेमी बगिचा गाठत असताना दिसला. कार्यकर्ते आणि नेत्यांची वाहने येथे रस्त्याकडेला उभी झाल्याने गाडय़ांची गर्दीच रस्त्याला दिसत होती. या सर्व गोंधळामध्ये पनवेलचे वाहतूक नियमन करणारे पोलीस अधिकारी मोहन पाटील अदृश्य झाले होते. कोणीही या, कोठेही वाहन लावा, असे शिवाजी चौकातले गुरुवार सायंकाळचे चित्र होते. आघाडीच्या नार्वेकरांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटनाचे व्यासपीठ हे सार्वजनिक स्वच्छतागृहाला खेटून उभारल्यामुळे यातील दरुगधी व्यासपीठावर दरवळत होती. पनवेल नगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता असल्याने व्यासपीठावरील अनेकांनी नाकाला झोंबले, पण कळाले नाही, अशी भूमिका घेतली. या स्वच्छतागृहामध्ये जाणाऱ्या प्रत्येक सामान्य व्यक्तीला दरुगधीचा सामना करावा लागतो. या प्रचार कार्यालयाच्या निमित्ताने गुरुवारी या त्रासाची अडीच तास झुळूक थेट भास्कर जाधवांसहित पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत, उपनगराध्यक्ष मदन कोळी, आमदार प्रशांत ठाकूर यांनीही अनुभवली. अखेर रात्री पावणेनऊ वाजता सभा आटोपली. पनवेलकरांची ही वेळ घरात जेवणाच्या थाळीसमोर असल्याची होती. त्या वेळी रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटली. राहुल नार्वेकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जाधव यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी शिवाजी चौकासमोरील एका इमारतीच्या गाळ्यामध्ये सुरू करण्यात आले. या वेळी त्यांनी त्यांच्या भाषणात भाजपवर जोरदार टीका केली. राहुल नार्वेकर हे यापुढे या कार्यालयातून पनवेलकरांचे प्रश्न हाताळणार असल्याने या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.

Story img Loader