मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी तसेच मतदानाच्या जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी जिल्हय़ातील कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची कॅम्पस अॅम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याचे तसेच शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेतले जाणार असल्याची माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी सुनील माळी यांनी दिली.
मतदार जनजागृतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीची सभा माळी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिलीप गोविंद, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) के. एन. चौधरी, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मोहन वाघ, डीआरडीएचे सहायक प्रकल्प संचालक सुभाष सातपुते आदी उपस्थित होते.
निवडणूक आयोगाने राज्यातील प्रत्येक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची कॅम्पस अॅम्बॅसिडर म्हणून नियुक्ती करण्याची सूचना केली आहे. निवडणुकीसंदर्भात मतदारांत जागृती करण्यासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या, १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या व कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसणाऱ्या एका विद्यार्थ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामध्ये विद्यार्थिनींना प्राधान्य दिले जाणार असल्याचे माळी यांनी सांगितले.
शालेय विद्यार्थ्यांकडून पालक व परिचित व्यक्तींची संकल्पपत्रे भरून घेतली जाणार आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांकडून ही संकल्पपत्रे विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील, नागरिकांनी स्वेच्छेने ती भरून द्यावीत, असे आवाहन करण्यात आले.
मतदार नोंदणीसाठी जिल्हय़ात विशेष मोहीम राबवल्याने मतदारसंख्येत मोठी वाढ झाली आहे, मतदार नोंदणी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांनी व मतदारयादीत नाव नसणाऱ्यांनी नाव नोंदवावे, असे आवाहन माळी यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा