निवासी शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक होऊन शिक्षक रूजू होत नसल्याची वस्तुस्थिती एकीकडे असतानाच आश्रमशाळेतील शिक्षक भरतीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मात्र, रूजू करून न घेता खोळंबून ठेवल्याने आता आम्ही नक्षलवादी व्हायचे का? असे संतप्त सवाल उमेदवारांनी विचारले आहेत.
विद्यार्थ्यांची आबाळ, तेथील सर्पदंश, आश्रमशाळेतील गैरप्रकार, भाडय़ाच्या जागेतील आश्रमशाळेतील गैरप्रकार, निकृष्ट दर्जाचे साहित्य अशा या ना त्या कारणाने आश्रमशाळांचा विषय प्रत्येक अधिवेशनात विचारला जातो. सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी गेल्या आठवडय़ात एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात निवासी शाळांमध्ये शिक्षक आणि इतरांची नेमणूक करूनही ते कामाच्या ठिकाणी रूजू झाले नसल्याची माहिती विधान परिषदेत दिली. मात्र, अमरावतीत आश्रमशाळांसाठी शिक्षकांची भरती प्रक्रिया पार पडल्यानंतरही पात्र उमेदवारांना रूजू करून घेण्यात आले नाही.
यासंदर्भात आदिवासी विकास विभागातील अप्पर आयुक्तांच्या कार्यालयात चकरा मारून उमेदवार गेल्या चार महिन्यांपासून जोडे झिजवत आहेत. मात्र, अंतर्गत प्रशासकीय बाबींमुळे विद्यार्थ्यांना रूजू करून घेतले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या २१ ऑगस्टला अमरावती विभागातील शिक्षक भरतीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिल्या. त्यानंतर निकालही जाहीर झाला. कागदपत्रांची पडताळणीही झाली मात्र, या चार महिन्यांपासून गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांना प्रक्रिया सुरू असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. प्राथमिक शिक्षण सेवकांची ९८ पदे तर उच्च प्राथमिकचीही अनेक पदांसाठी परीक्षा घेण्यापासून ते कागदपत्र पडताळणीपर्यंतची सर्वच प्रक्रिया पार पडली आहे.
डी.एड.करून गेल्या तीन चार वर्षांपासून उमेदवार बेरोजगार होते. आश्रमशाळेतील शिक्षक भरतीमुळे काही ना काही संसाराला हातभार लागेल या विचाराने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नोकरीविषयक आशा पल्लवित झाल्या. मात्र, आदिवासी विभागाने अद्यापही त्यांना रूजूपत्र न दिल्याने त्यांना निराशेने ग्रासले आहे. आता २६-२७ वय आहे.
सुरुवातीला शिक्षण सेवक म्हणून सहा हजार रुपये मानधनावर तीन वर्षे काम करावे लागेल. तो पर्यंत तिशी उलटून जाते. भविष्यासाठी पुढील तजवीज कशी करायची आणि कोणती धोरणे ठरवायची अशा विचित्र मानसिकतेत सापडलेले हे तरुण निराश झाले आहेत. त्यापेक्षा चंद्रपूर किंवा गडचिरोलीत जाऊन नक्षलवादी होणे काय वाईट अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. आदिवासी विभागातील अप्पर आयुक्त कार्यालयात आधीच्या अधिकाऱ्याने केलेल्या गैरप्रकारांमुळे या उमेदवारांच्या रूजू पत्रावर सही करण्यास संबंधित अधिकारी धजावत नसल्याचे समजते. म्हणूनच या शिक्षकांना गेल्या चार महिन्यांपासून थातुरमातूर उत्तरे दिली जात आहेत.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा