उन्हात तापणारी पत्र्याची शेड.. त्यातच उपाहारगृह, विश्रांतीगृह आणि शौचालयही.. ही अवस्था आहे बेस्टच्या वांद्रे बस टर्मिनसमधील चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहाची. कॅनेडियन वेळापत्रक लावून बेस्ट प्रशासन ग्लोबल असल्याचा दावा करणाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या सुविधा मात्र अगदी लोकल ठेवल्या आहेत. प्रवाशांना नियोजित स्थळी पोहोचवून या टर्मिनसवर येणाऱ्या बेस्टच्या चालक-वाहकांना या खुराडय़ामध्ये भोजन आणि विश्रांती करावी लागते. मात्र त्यात सुधारणा करण्याकडे बेस्ट प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
कॅनेडियन वेळापत्रकाच्या आधारे बसचालक आणि वाहकांच्या कामात सुसूत्रता आणण्याचा चंग बेस्ट प्रशासनाने बांधला आहे. पण दुसरीकडे मुंबईतील अनेक आगारांमध्ये चालक-वाहकांना विश्रांती करण्यासाठी सुविधाच नाही. कुठे बाकडे आहेत, तर पंखा नाही. कुठे पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्थाच नाही. पण मुंबईतील विस्कळीत वाहतुकीत गाडी हाकून थकूनभागून येणाऱ्या चालक-वाहकांना अपुऱ्या सुविधांचा सामना करीत आगारांमधील विश्रांतिगृहात आराम करावा लागतो. तेथे चार भिंतीच्या आत काही प्रमाणात चालक-वाहकांना सुरक्षित तरी वाटते. परंतु वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील (पूर्व) बेस्टच्या वांद्रे बस टर्मिनस स्थानकवजा चौकीची आणि त्यातील विश्रांतिगृहाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. वांद्रे रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी येथे बेस्टने बेस्ट बस टर्मिनस स्थानक उभारले आणि नंतर त्याकडे लक्षच दिले नाही. या स्थानकामधील विश्रांतिगृह म्हणजे चक्क पत्र्याची शेड. या शेडच्या आजूबाजूला कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. शेडमधील शौचालयाच्या दरुगधीमुळे क्षणभरही तेथे बसणे असह्य़ होते. मात्र तेथेच बसून चालक-वाहकांना भोजन करावे लागते. बसफेरी पूर्ण करून येणाऱ्या चालक-वाहकांना विश्रांतीसाठी तेथे पुरेशी बाकडेच नाहीत. उपलब्ध बाकडय़ांच्या आधाराने प्रचंड दरुगधी सहन करत चालक-वाहकांना विश्रांती करावी लागते. विश्रांतिगृहातील दाटीवाटी आणि स्वतंत्र खोली नसल्याने चालक-वाहकांना कपडेही बदलता येत नाहीत. उन्हाळ्यात तापणाऱ्या पत्र्यांमुळे घामाच्या धारा आणि असह्य़ उकाडय़ाने चालक-वाहक अस्वस्थ होतात. तर पावसाळ्यात गळतीमुळे शेडमध्ये डोक्यावर छत्री धरून बसण्याची वेळ येते. चालक-वाहकांच्या विश्रांतीच्या ठिकाणी उपाहारगृह असणे अपेक्षित आहे. परंतु येथे ती व्यवस्थाच नाही. त्यामुळे रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडून उघडे पदार्थ विकत घेऊन चालक-वाहकांना आपली भूक भागवावी लागते.
या स्थानकात दिवसभर सुमारे ३०० चालक-वाहकांची ये-जा असते. काही वेळा बसगाडय़ा मोठय़ा संख्येने या स्थानकात विसावतात. त्या वेळी विश्रांतिगृहात उभे राहण्यासाठीही जागा नसते. त्यामुळे काही चालक-वाहकांना स्थानकामध्ये उभ्या असलेल्या बसगाडय़ांमध्येच भोजन उरकावे लागते. विश्रांतिगृहात जागा नसल्यामुळे चालक-वाहकांना बसगाडय़ांमधील आसनांवरच बसून विश्रांती करावी लागते आणि बस सुटण्याची वेळ झाल्यानंतर ते मार्गस्थ होतात. एकीकडे प्रशासन कॅनेडियन वेळापत्रकाची अंमलबजावणी करून चालक-वाहकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत आहे, पण त्यांच्या विश्रांतीसाठी उभारलेल्या खुराडय़ांकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे.
विश्रांतिगृहातील असुविधांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न चालक-वाहकांनी अनेक वेळा केला. परंतु अद्यापही प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे चालक-वाहकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवसेना नगरसेवक अनिल त्रिंबककर यांनी चालक-वाहकांच्या या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी बेस्ट समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण दुधवडकर आणि महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांना पत्र सादर केले आहे. तातडीने चालक-वाहकांना सुविधा उपलब्ध करण्याची मागणीही केली आहे. परंतु ढिम्म प्रशासन त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही.

 

Story img Loader