नगर तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींमधील १२ जणांचे सदस्यत्व वैयक्तिक शौचालय नसल्याने रद्द करण्यात आल आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी हा आदेश दिला. तालुक्यातील एकुण ४९ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व शौचालय नसल्याच्या कारणातुन मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ व १६ द्वारे रद्द करावे, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेने पाठवला होता. त्यावर सुनावणी होऊन हा आदेश देण्यात आला.
सुनावणी दरम्यान शौचालय नसल्याने ते बांधण्यासाठी ४९ सदस्यांना एक वर्षांची मुदतवाढ विभागीय आयुक्तांनी दिली होती, तरीही त्यातील १२ जणांनी शौचालय बांधले नाही, परिणामी त्यांना सदस्यत्व गमावावे लागले. जिल्हा परिषदेने वर्षांपुर्वी हा प्रस्ताव पाठवला होता. यापुर्वीही जिल्ह्य़ातील १५० जणांचे ग्रामपंचायत सदस्यत्व याच कारणातून रद्द केले गेले होते.
सदस्यत्व रद्द झालेल्यांची नावे अशी (कंसात ग्रामपंचायतीचे नाव): सीताबाई रामकिसन वाळके (आंबिलवाडी), द्वारका विलास जगदाळे, बहिरु दत्तात्रेय नजन, ज्ञानदेव पांडुरंग दारकुंडे (बहिरवाडी), जालिंदर छगन वाकचौरे (बाराबभळी), सिंधू तात्याराम खांदवे (खांडवे), सुमन लहानू जऱ्हाड, शोभा चंदु खामकर (इसळक), भाऊसाहेब भगवान आव्हाड, सुनिल रंगनाथ पालवे (आव्हाडवाडी), मीना सहादू गायकवाड, सुनंदा विद्याधर नांगरे (खारेकर्जुने).

Story img Loader