सरकारी कामकाजातील चालढकलपणा नागरिकांना नवखा राहिलेला नाही. आरोग्यविषयक सरकारी विभागाची हीच मानसिकता असेल तर रुग्णाच्या जीविताचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महिला शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी संदर्भ सेवा रुग्णालयात १५ दिवसांपासून प्रतीक्षेत आहेत. याबाबत संबधित अधिकारी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असून संबंधित महिलेला शासकीय योजनेचा त्वरित लाभ मिळावा, अशी मागणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काचुर्ली येथील वाळाबाई लक्ष्मण बांगारे (३५) या कर्करोगावर उपचार घेण्यासाठी येथील संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल झाल्या. शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेतून उपचार व्हावेत आणि आर्थिक मदत मिळावी यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता त्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रक्रियेला १५ दिवसांहून अधिक काळ लोटला. या कालावधीत त्यांच्यावर उपचारासाठी काही चाचण्या करण्यात आल्या, मात्र या सर्व चाचण्या रुग्णालयात न होता बाहेरून करण्यात आल्या. त्यासाठी १५०० रुपयांचा खर्च झाला.
याशिवाय काही आवश्यक औषधे व इतर असा मिळून दोन हजार रुपये खर्च झाला.
वास्तविक राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या माध्यमातून उपचार मोफत होत असताना बाहेरून उपचार सुचविण्याचे कारण काय, असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे. तसेच लाभ जमा करण्यासाठी ऐनवेळी बँकेच्या खाते पुस्तकाची मागणी करण्यात आली आहे.
मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या बांगारे यांच्याकडे बँकेचे खाते पुस्तक नाही, मात्र या संदर्भात आवश्यक निवासी दाखला, सरपंचाचे शिफारसपत्र आदी पुराव्यांची पूर्तता करण्यात आली आहे, परंतु अद्यापही दोन हजार रुपये शुल्क भरा अन्यथा रुग्णालयातून सोडण्यात येणार नाही, असे आडमुठे धोरण रुग्णालय व्यवस्थापनाने स्वीकारले आहे.
याबाबत संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत सोनार, आरोग्य संचालक डॉ. बी. डी. पवार यांच्याशी चर्चा केली असता महिलेला घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले, परंतु अद्याप बांगारे यांना व्यवस्थापनाकडून घरी सोडण्यात आलेले नाही. बांगारे यांना आर्थिक लाभ त्वरित मिळावा, त्यांना घरी सोडण्यात यावे, अशी मागणी श्रमजीवी संघटनेच्या भगवान मधे यांनी केली आहे.
पंधरवडय़ापासून कर्करुग्ण शासकीय लाभाच्या प्रतीक्षेत
सरकारी कामकाजातील चालढकलपणा नागरिकांना नवखा राहिलेला नाही. आरोग्यविषयक सरकारी विभागाची हीच मानसिकता असेल तर रुग्णाच्या जीविताचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
First published on: 15-03-2014 at 05:06 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cancer patients waits for treatment