ताडोबातील व्याघ्रदर्शनासाठी जिल्ह्य़ातील शाळकरी विद्यार्थ्यांना सवलत देण्याच्या प्रस्तावावर वनखाते गंभीरपणे विचार करत आहे. याशिवाय, यासाठी काही बसेसची व्यवस्था सुद्धा करण्याची तयारी अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.
ताडोबातील व्याघ्रदर्शन अतिशय महागडे झाले असून या व्याघ्र प्रकल्पात शाळकरी विद्यार्थ्यांसाठी कोणतीही सवलत नाही, तसेच सर्वसामान्यांसाठी हे दर्शन परवडणारे नाही, अशा आशयाचे वृत्त लोकसत्ताने काही दिवसापूर्वी प्रकाशित केले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी या मुद्यावरून वनखात्यावर टीका केली होती. त्याची दखल घेऊन वनखात्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी आता समाजातील काही घटकांना व्याघ्रदर्शनात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुनगंटीवार यांनी आज लोकसत्ताशी बोलताना ही माहिती दिली. राज्यातील सरसकट सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना ही सवलत देता येणे शक्य नाही, मात्र या जिल्ह्य़ातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सवलत देण्याचा विचार सुरू असून तसा प्रस्तावही तयार करण्यात आल्याची माहिती मुनगंटीवार यांनी परदेशी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर दिली.
काही वर्षांपूर्वीपर्यंत ताडोबात विद्यार्थ्यांसाठी सहलींचे आयोजन केले जात होते. नंतर ही पद्धत बंद करण्यात आली. ताडोबातील प्रवेशाचे दर वाढल्याने विद्यार्थ्यांसाठी व्याघ्रदर्शन अशक्य झाले होते. या पाश्र्वभूमीवर आता याच जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात ताडोबात प्रवेश देण्याची तयारी परदेशी यांनी दर्शवली आहे. आधी ताडोबात बसेसच्या माध्यमातून व्याघ्रदर्शनाची सोय उपलब्ध होती. नंतर तीही बंद करण्यात आली. त्यामुळे आता केवळ चारचाकी वाहनधारकांना, तसेच वाहने भाडय़ाने घेण्याची क्षमता असलेल्या पर्यटकांनाच ताडोबात प्रवेश करणे शक्य होते. सर्वसामान्य नागरिकांना ताडोबात जाणे शक्य होत नव्हते. लोकसत्ताच्या वृत्तात याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. त्याची दखल घेऊन आता ताडोबात पर्यटनासाठी काही बसेस सुरू करण्याचा निर्णय सुद्धा अधिकाऱ्यांनी घेतला आहे. गेल्या आठवडय़ात ताडोबाच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा अशा बसेस त्वरित सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश दिले होते. यासाठी वनखात्याचे प्रधान सचिव अनुकूल असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. बसेस सुरू झाल्या तर सर्वसामान्यांना कमी खर्चात ताडोबाचे पर्यटन करणे सहज शक्य होणार आहे, मात्र या बसेसमधून पर्यटनासाठी जाणाऱ्या व्यक्तींना प्रवेश दरात सवलत दिली जाणार नाही. ताडोबाचे प्रवेशदर वाढवल्यामुळे पर्यटनातून मिळणाऱ्या महसुलात वाढ झाली असून हा महसूल बफरझोनमधील गावांच्या विकासावर खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवेशदर कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका परदेशींनी घेतल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा