सन २०१४ सालच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातील तरुणाईला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेत राहुल गांधी यांनी देशव्यापी दौऱ्याला सुरुवात केली असताना शिरोळ तालुक्यातील कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार तथा पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वयाची ९२ वर्षे पूर्ण केलेल्या आमदार डॉ. सा. रे. पाटील या ‘तरुण’ उमेदवारास पुन्हा तिकीट देण्याचे वक्तव्य भर सभेत केले आहे. विधिमंडळात सर्वात ज्येष्ठ असलेले डॉ. पाटील यांना करिष्मा करण्याची पुन्हा संधी असली तरी ते उमेदवारीचा स्वीकार कितपत करणार याबाबत साशंकता आहे. तनाने काँग्रेसमध्ये असलेल्या पण मनाने समाजवादी विचाराच्या असलेल्या आमदार पाटील यांना राजकीय वारसदार निवडताना कसरत करावी लागणार आहे. रक्ताचा वारसदार की जाहीरपणे निवडला गेलेला वारसदार यापैकी कोणाची निवड करायची की पक्षादेश म्हणून त्याचे पालन करायचे, हा पेच सोडविणे त्यांना कठीण जाणार आहे.    
शिरोळ तालुक्यातील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठानच्या पुरस्काराचे वितरण चव्हाण यांच्या हस्ते व हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या समारंभात दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. सा. रे.पाटील यांना लोखंडे प्रतिष्ठानचा समाजगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या समारंभात चव्हाण व हर्षवर्धन पाटील या दोघांनीही आगामी विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत डॉ. सा.  रे. पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. सा. रे. पाटील यांच्या समर्थकांनी टाळय़ांच्या प्रतिसादात या घोषणेचे स्वागत केले.    
दस्तुरखुद्द सा. रे. पाटील हे विधानसभा निवडणुकीसाठी कितपत इच्छुक आहेत, हा खरा प्रश्न आहे. वयाची ९२ वर्षे पूर्ण केलेले पाटील नव्याने विधानसभेच्या आखाडय़ात उतरून शड्डू ठोकतील असे सध्यातरी संभवत नाही. वयपरत्वे ते मतदारसंघातील समस्या, कार्यक्रम, संपर्क यासाठी इच्छा असूनही वेळ देऊ शकणार नाहीत. ते स्वत: समाजवादी विचाराने समाजस्थितीचे अवलोकन करणारे अभ्यासू कार्यकर्ते आहेत. त्यामुळे निवडणुकीतील जातीय समीकरणे व पैशाचा अवास्तव वापर या बिघडलेल्या परिस्थितीकडे ते बोट दाखवत राहतात. अशा स्थितीत ते स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरणे कठीण दिसते. त्यामुळे पाटील यांचा वारसदार कोण हा प्रश्न मात्र उपस्थित होतो.    
पाटील हे वय, जातीसमीकरण, पैसा याचे कारण दाखवून निवडणुकीपासून बाजूला जाण्याचा विचार बोलून दाखवत असताना त्यांचे कार्यकर्ते मात्र गणपतराव पाटील यांचे नाव आग्रहाने पुढे करीत राहतात. श्रीवर्धन बायोटेकच्या माध्यमातून अत्युत्तम दर्जाची व आंतरराष्ट्रीय फूलशेती कशी करावी याचा वस्तुपाठ पाटील यांचे सुपुत्र उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी घालून दिला आहे. अलीकडे त्यांनी दत्त कारखान्याच्या कामकाजात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. उदगाव व वीरशैव सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांचा समाज व कार्यकर्त्यांशी संपर्क वाढू लागला आहे. खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांशी संबंध दृढ करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय, शिरोळ तालुक्यात २५ ते ३० हजार इतका लिंगायत समाज असून तो बहुसंख्येने पाटील यांच्या पाठीशी उभा आहे. या घटकांचे अवलोकन केल्यास गणपतराव पाटील हे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून प्रभावीपणे पुढे येऊ शकतात.    
तथापि, समाजवादी विचाराचे आमदार पाटील हे आपल्या सुपुत्रास उमेदवार म्हणून पुढे आणून स्वत:च्याच वैचारिक बैठकीपासून हरकत घेणार का असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित राहतो. मध्यंतरी आमदार पाटील यांनी आपले राजकीय वारसदार म्हणून शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे नाव पुढे केले होते. तोच कित्ता विधानसभा निवडणुकीतही चालवला जाणार असल्याची आणखी एक शक्यता आहे. मात्र यड्रावकर हे पडले राष्ट्रवादीचे. त्यामुळे हा योग जुळणार कसा, असा नवा मुद्दा पुढे येताना दिसतो. पाटील पिता-पुत्रांनी निवडणूक लढवायची नाही असे ठरविले तर ते गेल्या निवडणुकीतील सहकार्याचे स्मरण ठेवून यड्रावकरांच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.    
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी सा. रे. पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचा आदेश नेते विलासराव देशमुख यांनी तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व नेत्यांना दिला होता. शिवाय सर्व साखरसम्राटांना राजू शेट्टी यांचा उमेदवार निवडून यावा, असे वाटत नव्हते. त्यामुळे त्या निवडणुकीत सा. रे. पाटील यांनी बाजी मारली. आता काँग्रेस पक्षामध्ये उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे रहा असे सांगणारा कोणी नसल्याने मोठी उणीव भासणार आहे. आमदार महादेवराव महाडिक यांचे समर्थक ‘गोकुळ’चे संचालक दिलीप पाटील हे पुन्हा उमेदवारीसाठी दावा करू शकतात. पंचगंगा साखर कारखाना हातातून निसटल्यापासून रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कन्या रजनी मगदूम तसेच उद्योगपती सुरेश पाटील यांनी मध्यंतरी वाढवलेला शिरोळ तालुक्याचा संपर्क आता खूपच कमी केला आहे. ही बदलली गेलेली समीकरणे लक्षात घेता आमदार सा. रे. पाटील हे पुन्हा एकदा विधानसभेच्या आखाडय़ात उतरणार काय, याचे उत्तर त्यांच्याकडूनच नजीकच्या काळात अपेक्षित आहे.

Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Rahul Gandhi Lok Sabha speech update
राहुल गांधी यांची फटकेबाजी; लोकसभेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका; सत्ताधारी खासदार संतप्त
Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News Updates : नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणाला पाठिंबा…”
Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील
competition between Ashok Chavan and Pratap Patil Chikhlikar over party defection
अशोक चव्हाण – चिखलीकरांमध्ये पक्षांतरावरून स्पर्धा
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
Story img Loader