कोल्हापूर जिल्हय़ाच्या राजकारणात बदल घडविण्यासाठी धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनी वेळ वाया न घालविता आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशी सूचना करीत, महाडिक यांच्यासारख्या युवा नेत्याला आपले पाठबळ राहणार असल्याचे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.
सोलापूर जिल्हय़ात मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत भीमराव महाडिक यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण कारखान्याच्या कार्यस्थळावर शरद पवार यांच्या हस्ते मोठय़ात थाटात करण्यात आले. या वेळी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना पवार यांनी मुन्ना महाडिक यांची भरभरून स्तुती केली. कोल्हापूर जिल्हय़ात खासदार सदाशिव मंडलिक यांच्या विरोधात आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी महाडिक यांनी तयारी सुरू केली आहे. आता त्यांना शरद पवार यांनी आशीर्वाद दिल्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणाची समीकरणे बदलणार काय, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष वेधले आहे.
महावितरण कंपनीने वीजबिल थकबाकीमुळे शेतक-यांकडील वीज तोडण्याची मोहीम हाती घेतल्यामुळे त्याविरोधात शेतक-यांची आंदोलने होत आहेत. त्याकडे लक्ष वेधले असता पवार यांनी महावितरण कंपनीने शेतक-यांच्या कृषिपंपाची वीजजोडणी न तोडता पूर्ववत ठेवण्याच्या सूचना देण्यास शासनाला सांगण्यात येईल, असे स्पष्ट केले.

Story img Loader