मुंबई महापालिकेत लिपिक पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध होताच सरकारी नोकरी मिळेल या आशेने राज्यभरातील इच्छुकांनी वेबसाइटवर तोबा गर्दी केली. मात्र ऑनलाइन अर्ज भरून झाल्यावर उमेदवारांच्या चलनाची प्रत येते ती मात्र उमेदवाराच्या वडिलांच्या नावाने. याबाबत पालिकेतून कोणताही खुलासा होत नाही.
महापालिकेने नुकतीच ९४२ लिपिक पदांसाठी जाहिरात दिली होती. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी लॉगइन केल्यानंतर प्रथम आडनाव, नंतर स्वत:चे नाव आणि मग वडिलांचे नाव भरण्यास सांगण्यात येते. याशिवाय शैक्षणिक माहिती, पत्ता, जन्म तारीख आदी अर्जासाठी आवश्यक ती माहिती भरण्यास सांगण्यात येते. यानंतर उमेदवारांना त्यांचे छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅन करून ती ‘जेपीईजी’ फॉरमॅटमध्ये अर्जासोबत अपलोड करावी लागते. ही सर्व प्रक्रिया करत असतानाही साइट अनेकदा धीम्या गतीने चालत असल्यामुळे उमेदवारांना वेळ लागत होता. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अर्ज सादर होतो. यानंतर स्टेट बँकमध्ये ऑफलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांच्या नावाने चलन तयार होते. या चलनामध्ये आणि पूर्ण भरलेल्या अर्जाच्या प्रतीमध्ये उमेदवारांना त्यांचे आडनाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी उमेदवाराचे नाव दिसत होते. यामुळे अर्ज आपण भरला की वडिलांनी, असा प्रश्न त्यांना पडत होता. यासंदर्भात उमेदवारांनी पालिकेत चौकशी केली असता त्यांना असा कोणताही प्रकार होत नसून सॉफ्टवेअर अचूक असल्याचे सांगण्यात आले. तुम्हीच अर्ज भरताना चुका करत असाल, असा उपदेश करण्यात आला.

कॉल सेंटरमध्ये चूक मान्य
पालिकेने जरी अर्ज प्रक्रियेत कोणतीही चूक नसल्याचे स्पष्ट केले असले तरी संबंधित कॉल सेंटरशी  संपर्क साधला असता त्यांनी ही चूक मान्य केली आहे. संपूर्ण राज्यातून ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्या सर्व उमेदवारांना ही अडचण येत आहे. ४-५ दिवसांत ही अडचण दूर होईल, असे कॉल सेंटरवरील अधिकाऱ्याने सांगितले. ज्यांचे अर्ज वडिलांच्या नावाने आले आहेत त्यांनी काय करावे, असे विचारले असता ‘४-५ दिवसांनी पुन्हा प्रिंट घ्या. माहिती अपडेट झालेली असेल.’ असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Story img Loader